समाजकल्याण विभागामार्फत उद्योग मेळावे घेणार – आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे
अहमदनगर येथे युवा उद्योग व्यवसाय शिबीर संपन्न

अहमदनगर, दि.१२ (प्रतिनिधी) – तरुण पिढीने व्यवसायाकडे वळले पाहिजे. जेणेकरून भावी पिढी सक्षम बनेल. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मार्फत तालुका स्तरावर देखील रोजगार मेळावे, व्यवसाय उद्योग परिचय कार्यशाळा घेण्याचे नियोजन करणार आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथे युवा उद्योजक व्यवसाय शिबीर व युवा उद्योजक गौरव पुरस्कार सोहळा डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बोरुडे, बाटी संस्थेचे उपायुक्त उमेश सोनवणे, अहमदनगर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, उमेद प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, समाजकल्याण विभागाचे संदीप फुंदे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते युवा उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, संपूर्ण राज्यात अनुसूचित जातीच्या युवकांसाठी स्वयं सहायता युवा गट तयार करून त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे त्या व्यवसाय चे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना उद्योग कसा सुरू करता येईल. उद्योगाची नोंदणी पासून ते त्याचे मार्केटिंग पर्यंत चे सगळे नियोजन आणि प्रशिक्षण आम्ही या संस्थेमार्फत देणार आहोत. यातून युवक व्यवसाय मध्ये अधिक सक्षम होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत आहे. त्यामध्ये परदेशात जाण्या येण्याचा खर्च, शालेय खर्च, लॅपटॉप व इतर सर्व खर्च संस्था करत आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन ही श्री. नारनवरे यांनी केले.
यावेळी सुभाष मराठे, राजेश उंबरकर, संदीप सोनवणे, प्रीतम देसाई यांच्यासह चर्मकार समाजातील बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केले सूत्रसंचालन श्री. संतोष कानडे यांनी केले तर आभार सुभाष मराठे यांनी मानले.