प्रशासकिय

जलयुक्त शिवार अभियानातुन गावे जलस्वयंपुर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्या:जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. १३ जुलै (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळुन पीक उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातुन गावे जलस्वयंपुर्ण करण्याबरोबरच निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
बैठकीस समितीचे सदस्य पद्मश्री पोपटराव पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गंगाराम तळपाडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करा*
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करण्याबरोबरच कामासंदर्भात असलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन बाबतची माहिती गावामध्ये होणाऱ्या ग्रामसभांमधुन प्रत्येक गावकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केल्या.
जलयुक्त शिवार अभियानातुन गावे जलस्वयंपुर्ण करण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणुन उपयुक्त ठरणाऱ्या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. या सर्व योजना या गावांमध्ये राबविण्यात येऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. गावामध्ये फेरफारची प्रलंबितता, शेतरस्ते मोकळे करणे, गावांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सोलारचा वापर, प्रत्येक गाव कचरामुक्त व हागणदारीमुक्त करणे यासह इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन निसर्गपुरक गावे निर्माणावर अधिक भर द्यावा. शासनाने एक रुपयामध्ये पीकविमा देण्याची योजना सुरु केली असुन या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी याची अधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
*अमृत सरोवर व जलशक्ती अभियानाचा घेतला आढावा*
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अमृत सरोवर व जलशक्ती अभियानाचाही जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेत पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब साचविण्यासाठी प्रत्येक शासकीय,निमशासकीय कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात यावा. जिल्ह्यात 116 ठिकाणी अमृत सरोवरची कामे सुरु असुन ही कामे करत असताना ती दर्जेदार, गुणवत्तापुर्ण करण्याबरोबरच सर्वसामान्यांना त्याचा वापर होईल, अशा पद्धतीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*विकासात्मक धोरणामध्ये जिल्ह्याचा मोलाचा वाटा – पद्मश्री पोपटराव पवार*
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोनच्या माध्यमातुन जिल्ह्यातील 257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणांच्या कामांमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एनएसएस व एनसीवी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरेल. योजनेसाठी निधीची कमतरता नसुन कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांची सोडवणुक करण्याची आवश्यकता आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या यशस्वीतेमध्ये जनसहभाग अत्यंत महत्वाचा असुन त्याचे उदाहरण म्हणजे हिरवेबाजार आहे. विकासात्मक धोरण तयार करण्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला असुन त्यादृष्टीने जलसंधारणाची कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जलशक्ती अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे