जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन मौजे-टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रामध्ये नर्स तसेच सफाई कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन. मौजे-टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रामध्ये नर्स तसेच सफाई कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे-टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रामध्ये तातडीने ANM(नर्स) तसेच सफाई कर्मचारी उपलब्ध करून करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, संतोष त्रिंबके, आप्पासाहेब केदारे, अमित गांधी, विजय मिसाळ, गौतमी भिंगारदिवे, प्रवीण राऊत, वर्षा गांगर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मौजे टाकळी काजी ता- जि-अहमदनगर येथील जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये कोरोना काळात तसेच त्यानंतर देखील अतिशय उत्तम प्रकारची सेवा तेथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वसामान्यांना देण्यात येत आहे .आजही तेथील दैनंदिन ओपीडी रुग्णांची संख्या ही दरदिवशी 45 ते 55 एवढी आहे. याव्यतिरिक्त दर गुरुवारी फॅमिली प्लॅनिंगचे तसेच महिन्यातून एकदा लॅप्रोस्कोपीचे ऑपरेशन हे घेतले जातात. कुठलीही दवाखान्यातील आरोग्य सेवा ही तेथील डॉक्टरांच्या कौशल्या प्रमाणेच तेथील साफसफाई वर अवलंबून आहे आणि आपण सर्वांनी कोरोना काळात साफसफाई ही किती महत्त्वाची आहे हे पाहिलेले आहे .मागील काही दिवसांपूर्वी तेथील एका सफाई कर्मचाऱ्याने सेवानिवृत्ती घेतली त्यामुळे आज तेथे मात्र एकच साफसफाई कर्मचारी आहे .आणि तोही रात्रपाळीसाठी उपलब्ध आहे. त्यातच या दवाखान्यातून 24 तास सेवा देणे हे आवश्यक आहे. परंतु आज एवढ्या मोठ्या दवाखान्याच्या इमारतीची स्वच्छता करण्यासाठी मात्र एकच सफाई कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर येथील रुग्ण संख्या व ऑपरेशन्स आणि कामाचा व्याप पाहता उपलब्ध असणाऱ्या दोन ए.एन.एम.(नर्स) वर कामाचा तणाव वाढत आहे ,त्यामुळे त्या ठिकाणी आणखी दोन नर्स आणि टाकळी काझी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र उक्कडगाव येथे एक ए.एन.एम असणे तातडीने आवश्यक आहे. फक्त मोठ्या इमारती बांधून आरोग्यसेवा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तेथे त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ हे तेवढेच किंवा त्या प्रमाणात असणं गरजेचे आहे. त्यामुळे याचा परिणाम आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेवर तसेच रुग्णांच्या आरोग्यावरही होईल याची काळजी सतावत आहे. तरी सदर आरोग्य केंद्राची पाहणी करून तेथील असणाऱ्या कमतरतेचा आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या कमी कर्मचाऱ्यांची संख्या यांची तातडीने पाहणी करून,आवश्यक ते मनुष्य बळ उपलब्ध करून घ्यावे व सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड थांबवण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.