तिरंगा मिळाल्याने भारावले दिव्यांग विद्यार्थी… ‘स्नेहबंध’चा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाहुण्यांनी दिलेल्या तिरंगा ध्वजामुळे सर्व दिव्यांग विद्यार्थी भारावून गेले, त्यांच्यात एक प्रकारचा उत्साह संचारला होता. निमित्त होते स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेप्ती रोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी अपंग कल्याण केंद्र शाळेत तिरंगा ध्वज वाटप उपक्रमाचे.
क्रांतिकारकांचे तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून या शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. याप्रसंगी हेमंत ढाकेफळकर, काकासाहेब बारवकर, झावरे यशवंती, सोनवणे भारती, बारवकर अनिता, जाधव रेखा, माने प्रकाश, ठुबे राहुल, पुरी आशा, दळवी स्नेहल कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आयुष्यातील उमेदीचा काळ देशासाठी दिला. त्या सर्वांचं बलिदान आपण स्मरावं, देशाविषयी, राष्ट्रध्वजाविषयी आदर, सन्मान निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे उद्धव शिंदे म्हणाले.
****त्यांच्या चेहऱ्यावर समाधान
या उपक्रमांतर्गत ‘स्नेहबंध’ने दिव्यांग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज दिले. तिरंगा मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
हर घर तिरंगा’ अभियानात विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे
शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणे आणि अमृत महोत्सवी वर्षाची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या, या अभियानात विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांकडे घरावर तिरंगा लावण्यासाठी आग्रह धरावा, असे आवाहन ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
घरोघरी तिरंगा अभियानात विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.