राजकिय

नगर दक्षिणेतून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी – किरण काळे ; राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेस करणार दावा, शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे थोरातांना साकडे

संगमनेर दि ३० मे (प्रतिनिधी) : येत्या दोन जूनला मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात नगर दक्षिणेचाही आढावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली आहे. नगर दक्षिणेतून आ. थोरात यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी अशी मागणी यावेळी काळे यांनी थोरातांकडे केली आहे. तसे साकडे शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घातले आहे.

कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे दक्षिणेत नवीन राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, विलास उबाळे, रोहिदास भालेराव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे आदींसह शहरातील कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

काळे म्हणाले की, आ.थोरात हे राज्यातील विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत आणि विकासात्मक व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तुकाराम गडाख वगळता राष्ट्रवादीला या मतदारसंघात सातत्याने अपयश आलेले आहे. विधानसभेच्या दक्षिणेतील सर्व जागा राष्ट्रवादी लढते आहे. दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळायचा असेल तर दक्षिणेची लोकसभेची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे.

सध्या देशात राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे. मोदींना सक्षम पर्याय मिळाला आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांनी शहरासह दक्षिणेतल्या मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. थोरात यांनी जिल्ह्याचे नेतृत्व दिल्लीत जाऊन करावे आणि राष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून दक्षिणेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा विकास करावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे मुंबईच्या बैठकीत दक्षिणेच्या जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे दक्षिणेतील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. विखे – थोरात संघर्ष जुना आहे. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती निवडणुकीत दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघामध्ये समोरासमोर पॅनल उभे केले होते. त्यातच दक्षिणेतून खासदार असणाऱ्या सुजय विखेंच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते थोरातांना घातलेले साकडे यामुळे आता उत्तरेतला हा संघर्ष दक्षिणेत देखील तीव्र होतो की काय हे येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे.

कामगार नेते विलास उबाळे यांचा प्रवेश :
कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या कामगार नेते विलास उबाळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री आ. थोरात यांच्या हस्ते किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा झेंडा स्वीकारत प्रवेश केला. जिल्ह्यात कामगारांचे संघटन बळकट करण्यासाठी लवकरच उबाळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी काळे यांनी केले आहेत.

भंडारींची सचिव पदी वर्णी :
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतिलाल भंडारी यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या सचिव पदी वर्णी लागली आहे. आ.थोरात यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे