ब्रेकिंगसामाजिक

ताबेमारीच्या घटनांना आळा घालण्याची मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शहर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी ; तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरेंवर पीडित विधवा ज्येष्ठ नागरिक महिलेचे गंभीर आरोप

अहमदनगर दि. 28 मे (प्रतिनिधी) : नगर शहरात ताबेमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. सावेडी उपनगरातील एका मोक्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही गैर कायद्याची मंडळी संगनमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या विधवा महिलेने तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे सादर करत आपली कैफियत मांडली होती. मात्र त्याला केराची टोपली दाखवली गेली होती. सदर पीडित महिलेने काँग्रेस पक्षाशी संपर्क साधल्यानंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.

यावेळी काळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून सुरू असणाऱ्या ताबेमारीच्या बेकायदेशीर घटनांना मोक्का कायद्यांतर्गत आळा घालण्याची, पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे तात्काळ निलंबन करीत तटस्थ, प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सत्यशोधक चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व एसपी ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कागदोपत्री पुरावे सादर करत शहर काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे.

याबाबत सदर विधवा ज्येष्ठ नागरिक महिलेने दि. २२ व २४ मे रोजी एसपींकडे लेखी तक्रार दाखल केली होती. यात पीडितेने तोफखाना निरीक्षक कोकरे यांच्यावर संगनमत करून सुपारी घेऊन गैरकायद्याच्या मंडळींना पाठबळ देत त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला होता. सदर विधवा महिला आणि कुटुंबीयांना दमदाटी, दादागिरी करत त्यांच्या जागेत बळजबरीने, अनाधिकाराने प्रवेश करून धक्काबुक्की करत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती.

दि. २५ मे रोजी पीडितेने तोफखाना पोलीस निरीक्षकांकडे फिर्याद दाखल करण्यासाठी सादर केलेला अर्ज स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे दि. २७ मे रोजी एसपींकडे पुराव्यांसह फिर्याद दिली. तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही. सदर पीडितेने तोफखाना निरीक्षकांकडून दाद मिळत नसल्या कारणाने मदतीसाठी शहर जिल्हा काँग्रेसकडे धाव घेतली. जिल्हाध्यक्ष काळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांसह जिल्ह्याच्या एसपींचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.

सावेडीतील एका मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भूखंडावर मागील सुमारे ४० ते ५० वर्षांपासून वाणी कुटुंबीयांचा कायदेशीर ताबा आहे. याबाबत नगर प्रांताधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली असून त्यांच्या सन २०१५ च्या आदेशाने ७/१२ ऱ्यावर रकाना क्र.१५ मध्ये जमीन करणाऱ्याच्या रकान्यात वाणी कुटुंबीयांची कायदेशीर रित्या महसुली नियमांप्रमाणे नोंद असून प्रत्यक्ष ताबा, कब्जा पीडित महिला आणि तिच्या मुलाबाळांचा आहे. सदर प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे असून देखील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या भाडोत्री गुंडांचा आणि ताबा मारणाऱ्या गैर कायद्याच्या मंडळींद्वारे दहशतीचा धाक दाखवून त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडित महिलेने आपल्या लेखी तक्रारीत केला आहे.

मनपा अतिरिक्त आयुक्तांचे अतिक्रमण विरोधी कारवाईचे आदेश :
विशेष म्हणजे पीडित महिलेने त्यांच्या कब्जातील जमिनीवर अनाधिकाराने प्रवेश करून मनपाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरित्या कंपाउंड करण्याचा प्रयत्न करत केलेची तक्रार नगर मनपा आयुक्त यांच्याकडे दि. २७ मे रोजी दाखल केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी हे कंपाऊंड कोणाचा प्रयत्न सुरू आहे त्या ठिकाणाहून विकास आराखड्यामध्ये नमूद असताना सुमारे १४ मीटर रुंदीचा रस्ता जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यावर अतिरिक्त मनपा आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाला पुढील कार्यवाहीचे देखिल आदेश निर्गमित केले होते.

पीडित महिलेवरच गुन्हा दाखल :
दरम्यान दि. २२,२४,२५ व २७ मे रोजी तोफखाना पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवणाऱ्या पीडिता व कुटुंबातील सदस्यांच्या विरोधातच अति कर्तव्यदक्ष असणाऱ्या तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरे यांनी २७ मे रोजी रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः ठाण मांडून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काळे म्हणाले की, कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी. मात्र पीडित महिला तोफखाना पोलीस निरीक्षकांना वारंवार दाद मागत होती. तिची फिर्याद दाखल करून घेतली गेली नाही. पीडितेवर अन्याय केला गेला असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

शहरातील ताबेमारी मुंबईतल्या गॅंगवॉर पेक्षाही भयानक :
किरण काळे म्हणाले, एकेकाळी मुंबईत गँगस्टरस मध्ये गॅंगवॉर व्हायचे. शहरात सध्या लँडमाफिया, ताबा गॅंग यांचा राजकीय वरदहस्त आणि प्रशासनाशी संगनमत करत धुडगूस सुरू आहे. पोलिसांनी मुंबईतील गँगस्टरचा खात्मा केला. शहरातील लँडमाफियांचा खात्मा पोलीस केव्हा करणार आहेत ? शहरातील लँडमाफिया हे गँगस्टर पेक्षाही भयानक आहेत. यामुळे सर्वसामान्य भयभीत नगरकरांना आपल्या पै पै जमा करून, घाम गाळून कष्टाच्या स्वमालकीच्या जमीनींचे संरक्षण करणे अवघड झाले आहे.

…या प्रकरणातून कोणाचे हत्याकांड नको :
जमीन जुमल्यांचे वाद हे क्लिष्ट असतात. दिवाणी न्यायालयात अनेक दावे-प्रती दावे दाखल असतात. खरा मालक कोण याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णतः दिवाणी न्यायालयांचा आहे. जोपर्यंत न्यायालय कोणताही आदेश करत नाही तोपर्यंत अशा प्रकरणांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणे, सदर मालमत्ता कवडीमोल भावात सराईतपणे ताबा गॅंगना बेकायदेशीर रित्या खाली करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जातात. यापूर्वी सावेडीत घडलेले हृद्रावक हत्याकांड अजूनही नगरकर विसरलेले नाहीत. त्या प्रकरणाला देखील ताबा प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पीडित विधवा महिलेच्या प्रकरणात अन्याय होणार नाही, या जमिनीवरून कुणाचे हत्याकांड होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्तिशः लक्ष घालून पीडित विधवा महिलेला न्याय द्यावा अशी काँग्रेसची मागणी असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे