शेळी, कबुतरे चोरल्याचा संशय चौघांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटना! गलांडेसह सहा जणांवर गुन्हा; एकास अटक

श्रीरामपूर : शेळी, कबुतरे चोरल्याच्या संशयावरून
तालुक्यातील हरेगाव परिसरातील चार मुलांना सहा जणांनी आपल्या शेतातील विहिरीवर नेऊन अमानुषपणे अर्ध नग्न करून बेदम मारहाण केली. निर्दयी मारहाणीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी हरेगाव बंद ठेऊन घटनेचा निषेध केला आहे. श्रीरामपूर शहरातही दलित संघटनांनी दिवसभर आंदोलने केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हरेगाव उंदिरगाव येथील शुक्रवार दि २६ रोजी सकाळी नऊ दहाच्या सुमारास युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या सहा जणांनी शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तेथे त्यांना अर्धनग्न करून दोरीने पाय बांधून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सायंकाळी उशिरा गावातील काहींच्या व्हाट्सएपवर आल्यानंतर काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत या मुलांची सुटका केली.
शनिवारी सकाळी गावात माहिती पसरल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गाव बंद ठेवण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
जखमींना येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने व डॉ. राहुल कुलकर्णी करीत आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच व मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा जमाव साखर कामगार रुग्णालयाच्या आवारात जमा झाला होता. त्यानंतर रुग्णालयासमोर नेवासा रोडवर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न झाला. भीमशक्तीचे संदीप मगर, प्रदीप थोरात, दीपक ओहोळ, नाना खरात, अक्षय माघाडे, अमोल शिंदे, मिलिंद सोनवणे, रोहित कोळगे, स्वप्निल पंडित यांच्यासह जमावाने आक्रमक भूमिका घेत घोषणा दिल्या.
रस्त्यावरील या ठिय्या आंदोलनात राहूल जाधव, संतोष शिंदे, सोनु मोरे, गणेश पवार, सनी बारसे, राहुल गायकवाड, साई बनकर, विशाल झालटे, आदेश जगताप, श्रीकांत गोरे, नितीन त्रिभुवन, दिपक चव्हाण, मिलिंद सोनवणे, राहुल मोकळ, प्रकाश पठारे, विश्वनाथ नरोडे, गौरव बागुल, रोहित शिनगारे, आलताफ पठाण, आदित्य जगताप, ऋषी जाधव, प्रशांत भोसले आदींचा सहभाग होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक निरिक्षक जीवन बोरसे, निकम आदींनी जमावाला शांत करून कारवाईचे आश्वासन दिले.
सायंकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार लहू कानडे, सुरेंद्र थोरात, दीपक पटारे, नितीन दिनकर, अरुण नाईक, सुभाष त्रिभुवन, मिलिंद साळवे, शरद नवले, प्रकाश चित्ते, मारुती बिंगले, संजय छल्लारे, भीमा बागुल, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, संदीप मगर, संतोष मोकळ आदींनी साखर कामगार रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपी अटकेत असतील, असे आश्वासन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.