नगरमध्ये योनेक्स सनराईज स्व.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

नगर : नगरमध्ये अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने दि.27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 या कालावधीत योनेक्स सनराईज स्व.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल राज्यस्तरीय 15 व 17 वर्षाखालील आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आहे. स्पर्धा वाडिया पार्क बॅडमिंटन हॉल येथे रंगणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अशोक कोठारी यांनी दिली.
असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, या स्पर्धेनिमित्त राज्यभरातील युवा बॅडमिंटन खेळाडू नगरला येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि.27 ऑगस्ट रोजी बॅडमिंटन हॉल येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या आशाताई फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की, नगरमध्ये प्रथमच एवढी मोठी भव्य स्पर्धा होत आहे. स्पर्धेत दररोज सकाळी 8 ते रात्री 9 या कालावधीत सामने रंगणार आहेत. आंतरजिल्हा स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात मुलांचे 31 ते मुलींचे 25 संघ सहभागी होणार आहेत. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 15 व 17 वर्षाखालील वयोगटातील 932 सामने होणार आहेत. एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या गटात हे सामने होतील. एकूण दहा गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनने 26 पंचांची नियुक्ती केली आहे. मिलिंद देशमुख हे मुख्य पंच म्हणून काम पाहतील. उप मुख्य पंच म्हणून विश्वास देसवंडीकर काम पाहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना साडेतीन लाखांची रोख बक्षिसे व ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे.
नगरमध्ये प्रथमच भव्य स्वरुपात राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याने अनेक गुणी खेळाडूंचा खेळ नगरकर बॅडमिंटन प्रेमींना प्रत्यक्ष पहायला मिळणार आहे. या स्पर्धेवेळी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.