अहमदनगर दि. 2 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे शारिरीक व मानसिक क्षमता विकसित होण्यास मोठी मदत होते. खेळाडुंनी खेळामध्ये निष्पक्षपातीपणे खेळत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, भूसंपादन अधिकारी बालाजी क्षीरसागर, भूसंपादन अधिकारी पल्लवी निर्मळ, भूसंपादन अधिकारी मनिषा राशिनकर, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, गौरी सावंत, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, पारनेरचे उप विभागीय अधिकारी गणेश राठोड, शेवगाव-पाथर्डीचे उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसिलदार संजय शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाखाली काम करावे लागते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मन व शरीर तंदुरुस्त राहून त्यांच्यात कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यालयीन कामाबरोबरच प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज स्वत:साठी वेळ द्यावा. शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी सांघिक भावना वाढीस लागणे गरजेचे आहे. जळगाव येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजवावी व जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या जिल्ह्याचे अस्तिस्त विभागीय स्पर्धांमध्ये दाखवुन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी अधिक चांगल्याप्रकारे तयारी करत विभागात जिल्ह्याचे नाव प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन तसेच आकाशात फुगे सोडुन करण्यात आले.
प्रास्ताविकात उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी क्रीडास्पर्धा आयोजनामागची भूमिका विषद केली.
यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संचलनाद्वारे उपस्थितांना मानवंदना दिली. या प्रसंगी ४०० व १०० मीटर धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रवरा पँथरच्या खेळाडूंना विजय पटकावला तर १०० मीटर स्पर्धेत अहमदनगर प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी विजय पटाकावला. संगीत खुर्ची स्पर्धेत उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला. या स्पर्धेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विजय पटकावला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले.
कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा