पूर्वी अनिलभैय्यांची शिवसेना फोडण्यासाठी आटापिटा करणार्या शहराच्या आमदारांचा आता किरण काळेंची काँग्रेस फोडण्यासाठी आटापिटा – मनोज गुंदेचा काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या अनंत गरदेंच्या प्रवेशावर काँग्रेसची सडेतोड प्रतिक्रीया

अहमदनगर दि.२१ जून (प्रतिनिधी) : पूर्वी नगर शहरामध्ये दिवंगत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांची शिवसेना फोडण्यासाठी शहराचे आमदार आटापिटा करताना पाहायला मिळायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळेच आता किरण काळे यांची काँग्रेस फोडण्यासाठी शहराच्या आमदारांचा सुरू असणारा आटापिटा हाच शहरात काँग्रेस भक्कम झाल्याचा पुरावा असल्याचे प्रतिपादन ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केले आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादीमध्ये मुंबईत प्रवेश केला. गारदे यांना जगताप यांनी राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. यानंतर जगताप यांनी काँग्रेस आणि किरण काळे यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्यावर काँग्रेसने आपली सडेतोड प्रतिक्रिया नोंदविली आहे.
याबाबत गुंदेचा म्हणाले की, अनंत गारदे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. किरण काळे यांनी त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांना शहर जिल्हा काँग्रेसमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी दिली. त्यांना ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देखील बहाल केलं. मानसन्मान दिला. मात्र त्यांच्यावर सातत्याने दबाव आणण्याचे काम आमदारांकडून सुरू होतं. माझे मुलींचे हॉस्टेल आहे. त्यामुळे आयटी पार्क भांडाफोड प्रकरणात किरण काळे यांना जसे खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यांनी अडकवले तसे मला व माझ्या मुलांना देखील खोट्या विनयभंगाच्या अथवा बलात्काराच्या केसमध्ये अडकवतील अशी भीती त्यांना सातत्याने वाटत होती.
त्यामुळे ते घाबरले होते. तसे त्यांनी पक्षाकडे बोलून देखील दाखविले होते. स्वतः आमदार त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी प्रवेशासाठी सातत्याने दबाव टाकत होते. त्यांचे माजी आमदार असलेले वडील देखील गारदे यांच्यावर सातत्याने दबाव आणत होते. त्यांच्या घरी जात होते. काँग्रेस फोडण्यासाठी प्रचंड आटापिटा गेल्या अनेक दिवसांपासून शहरात राष्ट्रवादीचा सुरू आहे.
गारदे यांनी पक्षनिष्ठा पाळली नाही. ते दहशती पुढे झूकले. दहशतीपुढे झुकणारा कार्यकर्ता हा किरण काळेंचा कार्यकर्ता असूच शकत नाही. त्यांच्या मैदान सोडून पळण्याच्या कृतीमुळे त्यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आले होते. अन्यथा पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांना सूचित करण्यात आले होते. या कारवाईच्या भीतीपोटी त्यांनी तत्पूर्वीच दि. ३० एप्रिल रोजी पक्षाकडे आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा सादर केला आहे. पक्षाने तो त्याच दिवशी तात्काळ स्वीकारून त्याला मान्यता दिली असल्याचे गुंदेचा यांनी स्पष्ट केले असून त्या राजीनाम्याच्या प्रतीच प्रसार माध्यमांना काँग्रेसने उपलब्ध करून दिल्या आहेत.
किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शहर काँग्रेस हा पळपूट्या आणि गद्दारांचा पक्ष नसून छत्रपती शिवराय आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा तसेच नगर शहराच्या विकासासाठी निर्भीडपणे लढणारा, दहशती विरुद्ध आवाज उठविणारा शूरवीर मावळ्यांचा पक्ष आहे. इथे गद्दारांना कोणत्याही प्रकारचे स्थान नसून अशांना पक्षातून थेट बाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो. काँग्रेस पक्षाची जोरदार संघटनात्मक बांधणी शहरामध्ये सुरू आहे. समाजवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाच्या प्रवेशानंतर आता अनेक चांगले चेहरे पक्षाच्या संपर्कात आहेत. येत्या काळात त्यांचे पक्ष प्रवेश महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वामध्ये झालेले पाहायला मिळतील, असे गुंदेचा यांनी म्हटले आहे.