राजकिय

मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव, यशवंत डांगेंची आयुक्तपदी केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करा – किरण काळे डांगे यांचा नगर मनपा कार्यकाळातील कारभाराची मंत्रालय स्तरावरून चौकशी करा, काँग्रेसची मागणी

अहमदनगर दि. 11 जुलै (प्रतिनिधी) : नगर मनपाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. फरार आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचा पीए देशपांडे हे अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये सापडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. ज्या राजकीय नेतृत्वाने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती त्यांचा या भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. या जागी मनपा प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या देविदास पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र भ्रष्टाचाऱ्यांना वाचवू पाहणाऱ्या नेतृत्वाला पवार यांच्या ऐवजी नगर मनपा मध्ये यापूर्वी उपायुक्त म्हणून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांना आयुक्तपदी बसवण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावण्याची दुर्बुद्धी झाली. मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव आहे. हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यशाली आहे. राज्य सरकारने डांगे यांच्या नियुक्तीचा फेरविचार करत तात्काळ रद्द करावी अशी मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

काळे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीच्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शहराच्या स्थानिक आमदारांनी शिफारस केली होती. भ्रष्टाचारी असणाऱ्या अत्यंत अयोग्य व्यक्तीची शिफारस करण्यात आल्यामुळे मोठा भ्रष्टाचार त्यांच्या कार्यकाळात नगर मनपात झाला. संगनमतातून सर्वसामान्य नगरकरांना लुटले गेले. वेठीस धरले गेले. धाडस करत संबंधित तक्रारदाराने त्यांच्या विरोधात अँटी करप्शनच्या माध्यमातून ट्रॅप लावला. जर ते दोषी नव्हते तर अद्याप फरार का आहेत ? त्यांना वाचविण्यासाठी राजकीय नेतृत्वाकडून जीवाचा अकांड तांडव का केला जात आहे ? हे नगरकरांना माहित आहे.

काळेंनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या भ्रष्टाचाराबद्दल सर्वसामान्य नगरकरांच्या सर्वच स्तरात तीव्र संतापाची भावना आहे. असे असताना प्रशासकीय कामकाजाचा तब्बल २० ते २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या देविदास पवार यांची नियुक्ती अवघ्या दोनच दिवसात तातडीने रद्द करून अति जलद गतीने सर्व प्रशासकीय प्रक्रियांच्या पूर्ततेचा फार्स करून यापूर्वी मनपात उपायुक्त पदावर काम केलेल्या यशवंत डांगे यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य सरकारने करणे हे अत्यंत धक्कादायक आहे. यासाठी ज्या राजकीय नेतृत्वाने यापूर्वीच्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कौतुकाचे इमले चढवत लेखी शिफारस केली होती त्यांनीच आता डांगे यांच्या नियुक्तीसाठी देखील आपले राजकीय वजन पणाला लावले होते. या नियुक्तीचा मास्टरमाईंड कोण आहे हे नगरकरांना माहित आहे. यापूर्वीच्या आयुक्तांकडून भ्रष्टाचाराची अर्धवट राहिलेली कामे नवीन आयुक्तांच्या माध्यमातून करून घ्यायची आहेत की काय ? म्हणूनच या नव्या नियुक्तीचा अट्टाहास केला आहे की काय ? असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

डांगे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करा :
यशवंत डांगे यांनी यापूर्वी नगर मनपामध्ये उपायुक्त पदावर काही काळ काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ज्या ज्या फईलींवर सह्या केल्या आहेत, ज्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्या सर्व कामांची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्यात यावी. त्यातून डांगे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे उघड होतील. त्यासाठी मंत्रालय स्तरावरून तातडीने चौकशी समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी, किरण काळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

मनपात झिरो करप्शन हवे, नियुक्तीचा निषेध :
यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांच्या नियुक्तीचा आम्ही शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तसेच नगरकरांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. नगरकरांना मनपामध्ये झिरो करप्शन (शून्य भ्रष्टाचार) हव आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी काँग्रेस तीव्र स्वरूपाचा लढा उभा करेल, असा इशारा डांगे यांच्या नियुक्तीवर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राज्य सरकारला आणि त्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करणाऱ्यांना दिला आहे.

आपली पापे झाकण्यासाठी अशा नियुक्त्या:
किरण काळे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, यापूर्वीच्या आयुक्तांकडून संगनमत करत केलेल्या भ्रष्टाचाराची आपली पापे उघड होऊ नयेत यासाठी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला सत्तेतील स्थानिक राजकीय नेतृत्वाकडून आणले गेले आहे. जेणेकरून यापूर्वी केलेली भ्रष्टाचाराची कृत्ये झाकता येतील. त्यासाठी काहीजण आटापिटा करीत आहेत. ज्यावेळी पापाचा घडा भरतो आणि ओसंडून वाहतो त्यावेळी मायबाप जनता जनार्दन भ्रष्टाचारी अधिकारी आणि राजकीय नेतृत्वाला त्यांची जागा दाखवून देते, हे अशा नियुक्तीसाठी पाठबळ देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा घाणाघात किरण काळे यांनी केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे