नगर (प्रतिनिधी) आठ दिवसापासून नगर शहरामध्ये सातत्याने कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज अखेर शहरांमध्ये 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्गांवर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. 178 कोरोना रुग्णांमध्ये 52 रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. लस न घेणाऱ्यांवर कारवाई करावी करून लस नाही, प्रवेश नाही याशिवाय शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देण्याचे कडक निर्बंध लावण्याची शिफारस आरोग्य समितीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासन आणि आराेग्य समितीची काेराेना रुग्णवाढ राेखण्यासाठी उपाययाेजनांची बैठक झाली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे,नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संजय ढोणे,सतीश शिंदे,सचिन जाधव,निखिल वारे,आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, शशिकांत नजान व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.
अहमदनगर शहरात ज्या भागात कोविडची रुग्ण संख्या वाढत आहे तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा. याचबरोबर पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयांमध्ये जाऊन करावे. आजपर्यंत 19 हजारांपैकी 8 हजार 93 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. 10 जानेवारीपासून बूस्टर डोसची सुरुवात होणार असून याचे नियोजन करून फ्रंटवर्करच्या कामाच्या ठिकाणी जागेवर जाऊन लसीकरण करण्याची साेय करावी, अशा सूचना आराेग्य समितीने केल्या. महापालिकेचे अडीचशे बेडचे कोविड सेंटर हॉटेल नटराज येथे सज्ज असून, अतिदक्षता रुग्णांसाठी विळद घाटातील विखे हॉस्पिटल येथे सुविधा करण्यात आली आहे. महापालिकेकडे 30 हजार रेमडिसिव्हीरचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली.