महाविद्यालयांच्या आवारात पोलिस भरारी पथकांची गस्त वाढवावी – किरण काळे विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मदतीसाठी तक्रार पेट्या बसवाव्यात, काँग्रेसची मागणी

अहमदनगर दि.२ ऑगस्ट (प्रतिनिधी) : न्यू आर्ट्स महाविद्यालयासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देत महाविद्यालयांच्या आवारात पोलिस भरारी पथकांची गस्त वाढवावी. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मदतीसाठी तक्रार पेट्या बसवाव्यात अशी काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश जाधव, सामाजिक न्याय युवा काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासारे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, बालिकाश्रम रोड, सावेडी हत्याकांडानंतर शहरातील एका माजी सैनिकाची देखील हत्या झाली. खुनी हल्ल्यांचे सत्र शहरात सुरूच आहे. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारा असून यामुळे पालक देखील चिंताग्रस्त झाले आहेत. महाविद्यालयं ही शिक्षणासाठी, युवा पिढीच्या जडणघडणीसाठीची महत्त्वाची केंद्र आहेत. मात्र शहरातल्या राजकीय वरदहस्तातून बोकाळलेल्या गुन्हेगारीमुळे युवा पिढीसमोर चुकीचे आदर्श निर्माण झाले आहेत. शहराच्या अधोगतीला ही बाब कारणीभूत असून यामुळे शिक्षणापासून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. ही बाब नगरकरांना अंतर्मुख करायला लावणारी आहे.
शहरातील राजाश्रयित गुन्हेगारीवर पुन्हा एकदा हल्लाबोल करताना काळे म्हणाले की, जी लोक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ल्यातील आरोपी आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तेच लोक कायदा सुव्यवस्था ढासाळल्याचा आरोप करत आहेत. ते समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे. महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, टवाळखोर युवकांना आळा घातला पाहिजे. त्यांना राजकीय बँकिंग नाही मिळाले पाहिजे. तसेच युवतींची छेडछाड करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. सुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये कायद्याच्या अनुषंगाने पोलीसांनी जनजागृती करावी. मुलींना व मुलांना त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या निर्भीडपणे महाविद्यालय व पोलीस प्रशासना पर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालय परिसरातील पार्किंग, स्वच्छतागृह, प्रत्येक मजल्यावर सकृत दर्शनी भागात, प्राचार्य, मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर तक्रार पेट्या बसविण्यात याव्यात. सदर तक्रारपेटीमधून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटार्यासाठी महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त समितीचे गठन करून निवारण करण्यात यावे, अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.
या उपक्रमात काँग्रेसचा विद्यार्थी व महिला विभाग पोलीस प्रशांत पोलीस व महाविद्यालय प्रशासनाला सक्रियपणे मदत करेल असे काँग्रेसने म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे डीवायएसपी अनिल कातकडे यांना देखील देण्यात आले आहेत.