स्व. अनिलभैय्या राठोडांचे नाव जुन्या मनपा वास्तूला देऊन आवारात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची मागणी ; शिवसेनेसह सर्व पक्षीय नगरसेवकांना पत्र पाठवणार, यात राजकारण आडवं न आणण्याचे केले आवाहन

अहमदनगर दि. १२ मार्च (प्रतिनिधी) : शहराची ३५ वर्षे सेवा केलेल्या स्व.अनिलभैय्या राठोड यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली. अन्याय जिथे होईल तिथे धावून जात मदत केली. आजही ते नगरकांच्या मनामध्ये आहेत. त्यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी जुन्या मनपा वास्तूला त्यांचे नाव देण्यात यावे. तसेच त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आवारामध्ये उभारण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
चितळे रोड येथील शिवालयात काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्मृतिदिनानिमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, काँग्रेस साफसफाई कामगार विभागाचे शहर संघटक प्रशांत जाधव आदींसह काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काळे म्हणाले की, पूर्णाकृती पुतळा उभा राहिल्यास आणि जुन्या मनपा कार्यालयाच्या वास्तुस स्व. अनिलभैय्यांचे नाव दिल्यास येणाऱ्या प्रत्येक पिढीला कायम त्यांच्या दैदिप्यमान कार्याची आठवण राहील. त्यांनी कायम दहशतीच्या विरोधात संरक्षण देण्याचे काम केले. त्यांचाच विचार पुढे नेत शहरात आम्ही देखील काँग्रेसच्या माध्यमातून दहशतीच्या विरुद्ध लढत आहोत. गोरगरिबांना मदत करत आहोत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहोत. शहर विकासासाठी काम करत आहोत.
शिवसेनेसह सर्व पक्षीय नगरसेवकांना पत्र पाठवणार :
काळे म्हणाले की, मनपात शिवसेनेची राष्ट्रवादीसह सत्ता आहे. त्यामुळे तातडीने यावर विशेष महासभा बोलण्यात यावी. ठराव पारित करण्यात यावा. तीन महिन्यांच्या आत दोन्ही कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी काँग्रेसची मागणी आहे. यासाठी लवकरच आम्ही शिष्टमंडळासह महापौर, आयुक्त यांची भेट घेणार असून महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय सर्व नगरसेवकांना सदर मागणीसाठी त्यांनी पाठिंबा देत एक मुखाने मनपात ठराव करावा, यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहोत.
यात राजकारण आडवं आणू नये :
काळे म्हणाले, यापूर्वी कुणीही मनपाच्या जुन्या वास्तूला अन्य कुठलं नाव द्यावं किंवा तिथे अन्य कुणाचा पुतळा उभारण्यात यावा अशा प्रकारची मागणी केलेली नाही. पण शहरातील राष्ट्रवादीला स्व. अनिलभैय्या हयात असतानाही त्यांची एलर्जी होती आणि आज ते नाहीत तरीसुद्धा त्यांना आजही एलर्जी आहे. त्यामुळे या मागणीला खो घालण्यासाठी कुणी इतर छोट्या मोठ्या संघटना, समूह यांना पुढे करून विनाकारण अन्य व्यक्तींचे पुतळे किंवा नाव देण्यासाठी मागण्या करायला लावून यात राजकारण आणू नये, असे आवाहन काळे यांनी केले आहे.