सामाजिक न्याय क्षेत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी : प्राध्यापक डॉ.सुधाकर शेलार
सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन

अहमदनगर दि.२६ जून (प्रतिनिधी)
सामाजिक न्याय क्षेत्रात राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून समाजाने त्यांच्या विचार व कार्याचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे मत अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.डॉ.सुधाकर शेलार यांनी व्यक्त केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून हा ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. येथील समाजकार्य महाविद्यालयात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज २६ जून सामाजिक न्याय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शेलार मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाला सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे, सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ.सुनील पठारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक श्री. मडाले, लेखाधिकारी श्री.गांगुर्डे सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड, भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या अधीक्षक रावसाहेब बाबर आदी उपस्थित होते.
प्रा. सुधाकर शेलार यावेळी म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, शेती पत्रकरिता अशा अनेक क्षेत्रात समाजातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले असून समाजसुधारणेच्या चळवळी मध्ये सुद्धा त्यांचे योगदान आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांचे नाव महाराष्ट्राच्या समाज सुधारणा चळवळीमध्ये नेहमी अग्रक्रमाने घेतले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली. महिलांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या जनतेप्रती जे विचार होते त्याच विचारांप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रजेची सेवा करण्याचा जो आदर्श होता. तोच आदर्श राजर्षी शाहू महाराजांचा होता. आज समाजामध्ये फक्त सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरे करून चालणार नाही, तर राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, आत्मसात करून त्याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ.सुनील पठारे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आजच्या कार्यक्रमात आपणस मार्गदर्शकांनी शाहू महाराज यांचे कार्य व विचारांबद्दलचे जे सांगितले. त्याप्रमाणे आपण सुद्धा गोरगरिबांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना मदत करू अशी प्रतिज्ञा घेऊ या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शासनातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या जाणाऱ्या सामाजिक न्याय दिनाबद्दलचा उद्देश आणि हेतू उपस्थितांना सांगितला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हा परिषदे पासून ते समाजकार्य महाविद्यालय पर्यंत समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीची सुरुवात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन दवढे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. या दिंडीमध्ये भाऊसाहेब फिरोदिया कनिष्ठ महाविद्यालयाचे, विद्यार्थी सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांची वेशभूषा चैतन्य गर्जे, याने तर सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा श्रवणी कुलकर्णी यांनी परिधान केली होती. दिंडीची सांगता समाजकार्य महाविद्यालय येथे झाली.
कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रसिका राजेंद्र गायकवाड, अमृता रणजीत सोनवणे, या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले, आभार श्री.कातकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.