पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली – किरण काळे जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर दि. १४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली. आजचा भारत याच भक्कम पायाभरणी वरती उभा आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. काँग्रेस नेते पंडित नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नेहरू यांच्या प्रतिमेला हार घालून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काळे म्हणाले की, पंडित नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान या नात्याने स्वतंत्र भारताच्या दैदीप्यमान उभारणीची पायाभरणी केली. यातून देशाच्या उभारणीच्या कार्यक्रमाला दिशा मिळाली. आज केंद्रात असणाऱ्या सरकारला मात्र देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा अनेक वेळा विसर पडल्याचे पाहायला मिळते. यातून केंद्र सरकारच्या संकुचीत विचारसरणीचे देशाला विकृत दर्शन घडत आहे.