ज्ञानज्योती सावित्री मातेचे स्त्री शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान -प्राचार्य डॉ. शेषराव पवार

पाथर्डी (प्रतिनिधी)
भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लावलेली शिक्षणाची मुहूर्त वेल आज सर्वच क्षेत्रात आपले यश झळकवत आहे, तिचा वेल गगनावर गेला आहे, असे प्रतिपादन डॉक्टर शेषराव पवार यांनी केले. विद्यार्थिनी मंच ,श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी अंतर्गत क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर म्हणाले, ज्ञानज्योती सावित्री मातेने बालविवाह प्रतिबंध ,बालहत्या प्रतिबंध सत्यशोधक विवाह ,
केशवपण बंदी ,दुष्काळात गरीब मुलांचे संगोपन ,विधवा पुनर्विवाह ,स्त्री शिक्षण या अनेक गोष्टींचे अलौकिक कार्य केले .त्याचेच फलित म्हणजे आज आघाडीच्या सर्व क्षेत्रांमध्ये असलेला महिलांचा सक्रिय सहभाग आपणास पहावयास मिळतो आणि याचमुळे आपल्याला आजही सर्व स्त्रियांमध्ये सावित्रीची झलक दिसते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी मंचच्या अध्यक्षा प्रा. अनिता पावसे यांनी केले. प्रा. पावसे म्हणाल्या, घराच्या उंबरठ्याबाहेर त्या काळात सावित्री मातेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल हे आधुनिक स्त्री शिक्षणाचा पाया उभारण्यास उपयुक्त ठरले. आजची स्त्री शिक्षणासाठी खूप संघर्ष न करता अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिक्षण घेऊ शकते ,हे फक्त आणि फक्त सावित्री मातेने केलेल्या अथक परिश्रमाची फलश्रुती होय म्हणूनच आपल्या हृदयात ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्री मातेचे स्मरण नित्य असावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी थोरात यांनी केले .सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल गंभीरे ,डॉ. अजिंक्य भोर्डे, श्री नाना केळगंद्रे श्री बाळासाहेब बांबळे व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.