माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देऊन सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाऊंडेशनची मागणी

कर्जत (प्रतिनिधी ): दि १२ मे
महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करीत सात विभागात सात यासह ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा व राज्यसभेत प्रत्येकी एक जागा देऊन माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाऊडेशन कर्जत यांच्यावतीने राज्यपाल व राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकतेच फाऊडेशनच्या वतीने मुख्यमंत्री,पंतप्रधान यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री व केंद्रीय निवडणूक आयोग यांना निवेदन ईमेलद्वारे पाठविण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी दिली.
माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळाल्यास त्यांच्याकडे असणाऱ्या अनुभवाचा प्रामाणिकपणाचा व इमानदारीचा देशाच्या विकासासाठी फायदा होऊ शकतो. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आणि केंद्रामध्ये सैनिक प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करीत असताना सैनिकांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातो. सैनिकांच्या शेतातील रस्त्यांची अडवणूक करुन स्थानिकांकडून त्रास दिला जातो व कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. राज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सात आमदार आहेत. मात्र आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आजी-माजी सैनिकांचे व शहीद सैनिक परिवारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यामध्ये सैनिक मतदार संघ निर्माण करून सात सैनिक आमदार व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासह माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत आरक्षण मिळावे ही देखील मागणी जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाऊडेशन कर्जत व महाराष्ट्र राज्यातील सैनिक परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. या मागणीसाठी राज्यातील जवळपास ५० हून अधिक सैनिक संघटनांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती भाऊसाहेब रानमाळ यांनी पत्रकारांना दिली.