वाढदिवसाला हार-तुरे नको, शहरातील खड्ड्यांचे फोटो भेट पाठवा : किरण काळेंचे नागरीकांना अनोखे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्ता शोधूनही सापडायला तयार नाही. यासाठी मी काँग्रेसच्या माध्यमातून लढा उभारत आहे. महापालिका, आमदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. वेळप्रसंगी मुंबईत यासाठी उपोषणाला बसण्याचा देखील इशारा मी दिला आहे. शहर खड्ड्यात असताना मला वाढदिवस साजरा करण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला हार-तुरे अजिबात आणू नयेत. या निमित्ताने मी शहरातली नागरिकांना तुमच्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो मला वाढदिवसाची भेट म्हणून पाठवा, असे अनोखे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
रस्त्यांच्या प्रश्नावर दाद न मिळाल्यास मुंबईत उपोषणाला बसण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. उपोषणाच्या वेळी नागरिकांनी पाठविलेल्या खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन मुंबई लावुन राज्य सरकार, मनपा आणि शहराच्या आमदारांचे लक्ष मी वेधेल, असे काळे यांनी जाहीर केले आहे. काळे यांचा ५ नोव्हेंबरला वाढदिवस असतो. दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मागच्या वर्षी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तत्कालीन क्रीडामंत्री सुनील केदार, आ.लहू कानडे, आ.डॉ. सुधीर तांबे, आ. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते काळे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरने नगरला आले होते. यावेळी किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने किरण कला – क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी काळे यांनी कार्यकर्त्यांना या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्याचे आवाहन केले असून शहरातील खड्ड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
काळे म्हणाले की, आज नगर शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी निगडित असणारा रस्त्याचा प्रश्न गेल्या ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा आक्राळ – विक्राळ रुप धारण करून आ वासून आपल्या सर्वांसमोर उभा राहिला आहे. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक उद्योजक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, भाजीवाला, रिक्षावाला, विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रत्येक घटक या समस्येने सामूहिक नैराश्येच्या गर्तेतेत सापडला आहे. हा प्रश्न आता कधीच सुटणार नाही, अशी भावना दुर्दैवाने नागरिकांची झाली आहे.
अशा परीस्थितीमध्ये वाढदिवसाचा समारंभ करत तो साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळेच यावर्षी वाढदिवसाला केक, हार-तुरे, बुके ही भेट न देता शहरातील रस्त्यांवर असणारे आपापल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो मला पाठवावेत. मी हे सर्व फोटो संकलित करून प्रशासन, शासन आणि लोकप्रतनिधींपर्यंत पोहोचवून नगरकरांच्या या गंभीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एल्गार करील. वेळप्रसंगी मुंबई उपोषणाला बसेल. फोटो पाठवण्यासाठी काळेंनी स्वतःचा ९०२८७२५३६८ वैयक्तिक व्हाट्सअप नंबर नागरीकांना उपलब्ध करुन दिला आहे.