चापडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने महसुल पथकाच्या ताब्यात

कर्जत( प्रतिनिधी) : दि ७ एप्रिल
कर्जत महसुल विभागाद्वारे सीना नदीतून अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर मंगळवारी रात्री कारवाई करण्यात आली. सदरची दोन्ही वाहने कर्जत तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आली आहे. त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
मंगळवार, दि ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सीना नदीतून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना मिळाली. आगळे यांनी तात्काळ पथक नियुक्त करीत चापडगाव (ता.कर्जत) गाठले असता त्यांना दोन हायवा विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन्ही हायवा बाबासाहेब घोडके व विजय संतोष कोकरे यांची असल्याचे सांगितले. सदरची दोन्ही वाहने अवैध विनापरवाना गौण खनिजाची (वाळू) वाहतूक करून करमाळा तालुक्यात नेत असल्याचे पथकास सांगितले. दोन्ही वाहने जप्त करीत पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आली. सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे, गौण खनिज महसूल सहायक अशोक नरोड, तलाठी धुळाजी केसकर यांनी पार पाडली.