दिव्यांगांच्या शाळा 1 मार्चपासून सुरू होणार:डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर दि. 25 (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभागांतर्गत येणा-या जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा 1 मार्च 2022 पासून सुरू करण्याचा निर्णय आजच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, महानगरपालिकाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजुरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या निवासी, अनिवासी, मतिमंद, मुखबधिर, अस्थिव्यंग व इतर प्रवर्गाच्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा शासन आदेशान्वये बंद होत्या. त्या आता 1 मार्च 2022 पासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण व क्रिडा विभागाच्या 20 जानेवारी 2022 च्या शासन परिपत्रकान्वये व सामाजिक न्याय विभागाच्या 16 फेब्रुवारी 2022 च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थितीचा विचार करुन या शाळा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.