पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे शहरात कायद्याचे राज्य नसून गुंडशाहीचे राज्य सुरु आहे – किरण काळे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षाकडून उद्योजक राजू जग्गी यांना जबर मारहाण, पंजाबी समाजातून संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर दि.२९ डिसेंबर (प्रतिनिधी ): दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात कुणा ना कुणावर तरी हल्ले सुरू आहेत. गुंडांनी शहरात धुडगूस घातला आहे. तारकपूरच्या गर्दीच्या रहिवासी भागात भर दुपारी शहरातील नामांकित उद्योजक राजू जग्गी यांना जबर मारहाण केली गेली. महिलांवर देखील हल्ला केला गेला आहे. पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे शहरात कायद्याचे, लोकशाहीचे राज्य उरले नसून गुंडांचे गुंडशाहीचे राज्य सुरु असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे शीख समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जखमी राजू जग्गी यांची बुधवारी रात्री उशिरा काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयात जाऊन समक्ष भेट घेत विचारपूस केली. भयभीत जग्गी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी उद्योजक प्रदीपशेठ पंजाबी, राजू जग्गी यांचे कुटुंबीय, शीख समाज बांधव, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदी उपस्थित होते. रात्री उशिरा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जग्गी परिवारातील महिलेच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचा जिल्हाध्यक्ष गजानन अरविंद भांडवलकर, त्याचा भाऊ (नाव माहित नाही) यांच्यावर भादवि 354, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जग्गी कुटुंबीयांमध्ये वडिलोपार्जित जागेवरून दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने नुकताच राजू जग्गी यांच्या अर्जावरील सुनावणीत सदर जागा न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही वारसदाराने न विकण्याचा आदेश केला आहे. मात्र आरोपी भांडवलकर याने आमच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मारला असून बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे. त्याबाबत विचारणा केली असता आमच्यावरती हल्ला करण्यात आला असल्याची माहिती राजूशेठ जग्गी यांनी दिली आहे. कौटुंबिक जागेच्या वादात न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. त्याबद्दल कोणी बोलणे उचित नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत बेकायदेशीररित्या ताबा मारून मारहाण करून दहशत करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काळे यांनी तातडीने ईमेलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवत शहरातील गुंडगिरीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी भांडवलकर हा देखील जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील जामिनावरील आरोपी आहे. दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यावर हल्ला करणारा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी सुरज जाधव हा देखील याच प्रकरणातील आरोपी आहे. शहरात अशा गुन्हेगारांची साखळी तयार झाली असून साखळी पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्याने राजकीय वरदहस्तातून दहशत माजवली जात असून उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, गोरगरीब यांना धमकावणे, त्यांच्या जागांवरती बेकायदेशीर ताबे मारण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असून पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळेच राजकीय गुंडांची हिम्मत वाढली असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काळे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचे केंद्र असणारे एसपी ऑफिसच आम्ही फोडू शकतो. तरी आमचे काहीही वाकडे झाले नाही, असा समज या राजकीय गुंडांचा झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसांवर दहशत करताना या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही. मंगळसूत्र चोरी, घरफोड्या, चोऱ्या करणारे सराईत गुन्हेगार ज्याप्रमाणे वारंवार गुन्हे करतात त्याच पद्धतीने शहरातील काही ठराविक राजकीय गुंड राजकीय पाठबळातून वारंवार दहशत माजवत आहेत. पोलिसांनी यांच्या तात्काळ मुसक्या आवळाव्यात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची विशेष बैठक बोलावून याबाबतीत कठोर सूचना द्याव्यात. शहरातील गुंडांचा धुडगूस थांबला नाही तर काँग्रेस लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने काळे यांनी दिला आहे.