बहुजन समाज निर्मितीसाठी कांशीरामजी यांनी आपले आयुष्य व्यतीत केले -प्राचार्य भोसले

राहुरी दि.१७(प्रतिनिधी) सामाजिक आर्थिक शैक्षणिकआणि धार्मिक दृष्ट्या जाती ,जमाती, अल्पसंख्याक समूहात विभागलेल्या बहुजन समाजास एकत्रित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य मान्यवर कांशीरामजी यांनी व्यतीत केले. असे प्रतिपादन माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी केले. ते संघमित्रा विद्यार्थी आश्रम, राहुरी येथे आयोजित केलेल्या मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. प्रकाश संसारे होते .
प्राचार्य भोसले पुढे म्हणाले की ,पंजाब मध्ये जन्मलेल्या कांशीरामजी यांनी प्रचंड त्याग केला .आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण बहुजन समाजाच्या निर्मितीसाठी खर्च केला. विभागलेल्या बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी त्यांनी बामसेफ, दलित शोषित समाज संघर्ष समिती, बहुजन समाज पक्ष,पे बॅक टू सोसायटी, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर इ.संघटना स्थापन केल्या. मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे जीवन कार्य मी जवळून अनुभवले .कार्यकर्त्यात जोश इतकाच होश आवश्यक असल्याचे कांशीरामजी सांगत . त्यांनी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेतली . वर्षातील ३६५ दिवसात ते ४०० सभा घेत . खाण्याची , राहण्याची आरोग्याची तमा न बाळगता त्यांनी बहुजन समाजाला उभे केले .सामाजिक चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाज पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवला.त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून बहुजन समाज भरकटल्याने अधोगतीला चालला आहे. कांशीरामजी यांनी मोठ्या कष्टाने समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.स्वत:घ्या समर्पित जीवनातून फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर बहुजन चळवळ चालविली.आज या विचारधारेने चालणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी आवश्यकता आहे. अध्यक्षीय भाषणात अॅड प्रकाश संसारे यांनी मान्यवर कांशीरामजी यांच्या कार्यशैलीची महती विषद केली . यावेळी सत्येंद्र तेलतुंबडे , प्रा. मेघराज बचुटे , माजी प्राचार्य सुभाष पोटे . एमआय एम चे इम्रान देशमुख आदिंनी आपले समयोचित विचार मांडले. संजय संसारे यांनी सुत्र संचालन केले . प्रा. सुभाष पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले .