रोड रोमियोंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार..!” – पोलीस निरिक्षक रामराव ढिकले

लिंपणगाव दि.६ जुलै ( प्रतिनिधी)
श्रीगोंदा शहरातील व तालुक्यातील शाळा, विद्यालये व महाविद्यालये आवारात तसेच रोड वर निष्कारण फिरुन विद्यार्थींनीना त्रास देणा-या रोड रोमियोंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार असल्याचे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांनी बोलताना सांगितले. पंचायत समितीतील सभागृहामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्था चालक यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी रामराव ढिकले बोलत होते.
कोविड १९ च्या नंतर शाळा, कॉलेज पुर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. तालुक्यातुन विद्यार्थी व विद्यार्थीनी वाहनाने, सायकलवर किंवा एस.टी.ने येत असतात. एस.टी. स्टॅण्डपासुन कॉलेज पर्यंत व कॉलेज सुटल्यानंतर स्टॅण्ड पर्यंत तसेच घरापर्यंत विद्यार्थींनीना काही रोड रोमियो विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही रोड रोमियावर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या धर्तीवर श्रीगोंदा पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. शाळा, विद्यालय व महाविद्यालय आणि पोलीस यांचा समन्वय रहावा. टुकार, विनानंबरच्या गाड्या, शालेय आवारात विनाकारण फिरणारे तरुण, विद्यार्थीनींचा पाठलाग करणारे यांचा बंदोबस्त करता यावा यासाठी ही महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली होती.
प्रत्येक शाळा, कॉलेजवर जाऊन कारवाई करण्यात येईल. खासगी कपड्यातील फिरते पथक नेमण्यात येतील. शालेय दक्षता समिती नेमण्यात येतील. शालेय आवारात मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे कार्यालयाच्या बाहेर तक्रार पेटी बसवावी आणि त्यातील तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. त्याचे निवारण आम्ही करणार आहोत. तसेच विनाकारण फिरणारे रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यात येईल. कोणाची ही गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांनी ठणकावुन सांगितले.
याप्रसंगी प्राचार्य म्हस्के सर, गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले व नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी मनोगते व्यक्त केली.
श्रीगोंदा तालुक्यातील शाळा, श्रीगोंदा शहरातील शाळा, विद्यालये व महाविद्यालयातील प्राचार्य व तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, संस्था चालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ताजी जगताप यांनी केले. आभार गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे यांनी मानले.