कर्जत तालुक्यातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

कर्जत (प्रतिनिधी ): दि ३० जून
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीसह परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व कायम रहावे व सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करण्यासाठी घातक हत्यारांसह दरोडा, जबरी चोऱ्या, लोखंडी रॉड तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, यासह किरकोळ कारणावरून नागरिकांना मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तालुक्यातील एक टोळी प्रमुखासह त्याच्या सदस्यावर कर्जत पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. या दोघांनाही नगर जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू उर्फ राहुल बाळासाहेब कदम (वय २८ वर्षे. रा. परीटवाडी, ता.कर्जत, जि. अहमदनगर) आणि शक्ती उर्फ विशाल अशोक अडसूळ (वय २७ वर्षे, रा. राशिन, ता.कर्जत, जि.अहमदनगर) या इसमांची तालुक्यात एक टोळी सक्रिय असुन ही टोळी धोकादायक, खुनशी, धाडसी व भयंकर आक्रमक, आडदांड, नंगाड वृत्तीची आहे. या टोळीकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत कर्जत पोलिसांनी त्यांच्यावर वारंवार कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. मात्र त्यांच्यात कसलीही सुधारणा झाली नाही. या टोळीविषयी नागरिकांच्या मनात भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेंचवया टोळीविरुद्ध कुणीही उघडपणे तक्रार, साक्ष अथवा माहिती देण्यास पुढे येत नाही. भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी कर्जत पोलिसांनी वरील दोघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून ही टोळी अतिशय घातक, आक्रमक, धोकादायक असल्याचे नमूद करून चौकशी अहवाल प्राधिकरणाकडे सादर केला. त्यानंतर संबंधित गुन्हेगारांनी वकिलामार्फत बचावाचे लेखी म्हणणे सादर केले होते. मात्र हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी टोळीवरील सर्व दाखल गुन्हे, टोळीने केलेल्या बाबींचा व्यापक विचार करून टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ नुसार संबंधितांवर हद्दपारीचा आदेश केला आहे. त्यामध्ये हद्दपारीचा कालावधी संपेपर्यंत लेखी परवानगीशिवाय त्यांना नगर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. तसेच हद्दपारीच्या कालावधीत जेंव्हा कोणत्याही ठिकाणी ही टोळी व त्यातील सदस्य राहतील त्यांनी तेथील नजीकच्या पोलीस ठाण्यात पत्ता बदल करायचा असो किंवा नसो त्यासंदर्भत महिन्यातुन एकदा कळवणे गरजेचे असल्याचे आदेश दिले आहेत. सदर आरोपींना बुधवार, दि २९ रोजी जिल्ह्याबाहेर सोडण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी पत्रकारांना दिली.