कर्जतला मान्सून पावसाची हजेरी, राशीन मंडळात सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद

कर्जत (प्रतिनिधी) : दि २७ जून
सोमवारी देखील मान्सून पावसाने कर्जत शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावात हजेरी लावली. रविवारी राशीन महसूल मंडळात सर्वोच्च ४२ मिमी पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी माही आणि कोंभळी क्षेत्रात ३ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
सोमवार, दि २७ रोजी देखील मान्सून पावसाने कर्जत शहरासह तालुक्यतील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. सोमवार कर्जतचा आठवडे बाजार असल्याने नागरिकांसह बाजार विक्रेत्यांची चांगलीच त्रेधापीट उडाली. मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर जाणवत असताना रविवारच्या अनेक भागात झालेल्या मुसळधार आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने समाधानकारक दिलासा मिळाला आहे. रविवार, दि २६ रोजी कर्जत तालुक्यातील महसूल मंडळनिहाय पडलेला पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : राशीन ४२ मिमी, भांबोरा २८ मिमी, कर्जत १३ मिमी, माही ८ मिमी, मिरजगाव ३ मिमी आणि कोंभळी ३ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
****** “जमिनीत पुरेशी पेरणी योग्य ओल असल्यास त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी” – कृषी अधिकारी म्हस्के
कोभंळी, मिरजगाव आणि माही या महसूल मंडळात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जो पर्यंत मातीमध्ये पुरेशी ओल येत नाही तो पर्यंत पेरणी करावी टाळावी. बाकी मंडळ क्षेत्रात रविवारच्या समाधानकारक पावसाची नोंद झाली असून जमिनीतील ओल पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही. यासह शेतकर्यांनी बियाण्याची पेरणी करताना, बुरशीनाशक, व जैविक खत हे बियाण्याला चोळावे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होवु शकेल. तसेच मुख्य बियाण्यासोबत सापळा पिकाचे बियाणे देखील पेरावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के यांनी शेतकऱ्यांना केले आहे.