
अहमदनगर दि.१३ जून (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका सध्या सुरू आहेत. नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदासह कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवडणूक रविवारी पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत विद्यमान ब्लॉक अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला यांना बढती देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसाठी प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत सत्कार करण्यात आला आहे.
*महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने ब्लॉक काँग्रेसच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.* शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी निवडणुक निरीक्षक म्हणून काम पाहिले. जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातील कार्यकारणीमध्ये अल्पसंख्यांक, महिलांसह नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. लवकरच विस्तारित कार्यकारीणी देखील गठीत केली जाणार आहे.
अशोक शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा सावेडी उपनगरामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत. युवक काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस असणाऱ्या स्वप्निल राजेंद्र पाठक यांची पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणीत वर्णी लागली असून त्यांच्यावर ब्लॉक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवा चेहरा असणाऱ्या राहुल शिंदे यांची ब्लॉक खजिनदारपदी निवड झाली आहे. बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी भागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी असणाऱ्या हनिफ मोहम्मद जहागीरदार यांना कार्यकारी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. मुकुंदनगर, झेंडीगेटसह शहरातील अल्पसंख्यांक समाजात त्यांचा चांगला संपर्क आहे. महिला प्रतिनिधी म्हणून अमृता कानवडे यांची कार्यकारी सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यांचा शहराच्या मध्यवर्ती भागात महिलांसह सर्वच घटकांशी चांगला संपर्क आहे. सुप्रसिद्ध दिवंगत वकील हरिभाऊ कानवडे यांच्या त्या कन्या आहेत. राहुल गांधी विचार मंचाचे शहराध्यक्ष सागर ईरमल यांची देखील कार्यकारी सदस्यपदी निवड झाली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी नगर शहरामध्ये काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करतील. काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देतील, असा आशावाद यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी आ. प्रणिती शिंदे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एकवीरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई बाळासाहेब थोरात, महानंदाचे अध्यक्ष रणजित देशमुख, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश प्रवक्त्या तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते आदींनी अभिनंदन केले आहे.