नगर – पाथर्डी महामार्गाचे काम सुरू व्हावे यासाठी आ.निलेश लंके यांच्या उपोषणास पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा!

पाथर्डी (प्रतिनिधी)
मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या नगर -पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम सुरू व्हावे यासाठी पारनेरचे आमदार मा. निलेश लंके येत्या सात तारखेपासुन जिल्हाधिकारी कार्यालय,नगर येथे बेमुदत उपोषण आंदोलन करत असून त्यांच्या या आंदोलनास पाथर्डी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी दिली.
मागील सहा वर्षापासून अधिकारी -पदाधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगत मुळे पाथर्डी उपविभागीय अधिकारी कार्यकक्षेतील सुमारे ५५ की.मी. राष्ट्रीय महामार्गाचे काम फक्त कागदोपत्री पूर्ण दाखवून या कामासाठी मंजूर रकमेचा संगणमताने अपहार करण्यात आल्यामुळे नगर-पाथर्डी-फुंदेटाकळी हा सुमारे ६५ की.मी. चा महामार्ग “महामृत्यूमार्ग” बनला आहे.सुमारे साडेतीनशे निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या राक्षसी महामार्गाची बळीची भूक दिवसेंदिवस वाढत आहे.गुडघाभर खोल व सुमारे दहा ते पंधरा फूट रुंदीच्या प्रचंड मोठ्या खड्ड्यातून प्रवास करत असताना बसणाऱ्या प्रत्येक दणक्यानंतर प्रवास करणारा प्रवासी हा या महामार्गाच्या भयान अवस्थेवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत प्रवास करत असतो तरी देखील गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला याचे काहिही सोयरसुतक नाही.या महामार्गावरील प्रत्येक गावात या महामार्गाच्या दुरवस्थेच्या विरोधात आंदोलन झाले आहे,पाथर्डी शहरात या महामार्गासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची तर एक मोठी फाईल तयार होऊ शकते एवढी आंदोलने झाली आहेत.
मनसेच्या वतीने ही यापूर्वी अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करण्यात आलेली आहे त्यातील महामार्गाच्या कार्यालयावरील “हल्लाबोल आंदोलन” व मा. नितीन गडकरी साहेब यांची पाद्यपूजा अशी आंदोलन गाजली देखील आहेत,अशा प्रत्येक आंदोलनाच्या वेळी अधिकारी-पदाधिकारी यांनी आंदोलकांना ‘काही दिवसात रस्त्याचे काम सुरू करू,लगेचच रस्त्यातील खड्डे बुजूवू’ अश्या प्रकारची भरभरून लेखी खोटी आश्वासने देऊन आंदोलने दडपलेली आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्यासाठी संभाजीनगर खंडपीठात याचिका देखील दाखल केली आहे.
विद्यमान खासदार सुजय विखे यांनी निवडून आल्यानंतर ‘एक वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण करूनच दाखवतो’ अशी भीष्म प्रतिज्ञा त्यावेळीं केली,भाबड्या पाथर्डीकरानी त्यांच्या अशा आश्वासनाला बळी पडून भरघोस मतांची बेगमी करून त्यांना निवडून दिले,परंतु पदरी घोर निराशा व्यतिरिक्त काहीच पडले नाही.मात्र आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील हा विषय नसतानाही या महामार्गाच्या दुरावस्थेवरून येत्या सात तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.या महामार्गाचे काम खरोखर पुर्ण व्हावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असेल तर पक्ष भेद विसरून या आंदोलनास पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचे जिरेसाळ यांनी म्हटले आहे. मात्र आ.लंके यांच्या या आंदोलनाच्या अगोदर या महामार्गासाठी झालेल्या ईतर आंदोलनाप्रमाणेच या आंदोलन प्रसंगीही अधिकारी -ठेकेदार यांनी आ. लंके यांना कागदावर लेखी आश्वासन देऊन खोटे वागत हे आंदोलनही दडपून टाकण्याची शक्यता असून अशा प्रकारे खोट्या आश्वासनावर आंदोलन थांबवल्यास याही आंदोलनाचा फक्त फार्स ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी जोपर्यंत या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तोपर्यंत आ.लंके यांनी आपले बेमुद्त उपोषण आंदोलन थांबवु नये अशी समस्त पाथर्डीकरांच्या वतीने आपण त्यांना विनंती करीत असल्याचे जिरेसाळ यांनी म्हटले आहे.