ऐतिहासिक अहमदनगरच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेचे आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
अहमदनगरची अक्षर परंपरा’ व ‘भारतीय इतिहासाचे मोती’ ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

अहमदनगर, 26 मे (प्रतिनिधी) भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन महोत्सवानिमित्त देशभरामध्ये “आजादी का अमृत महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची प्रेरणा देणाऱ्या 6 जून या शिवस्वराज्य दिनानिमित्त तसेच ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यावतीने ‘अहमदनगरची अक्षर परंपरा-2022’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे तसेच ‘भारतीय इतिहासाचे मोती’ या ग्रंथ प्रदर्शनाचे 28 मे ते 8 जून, 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार 28 मे, 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा ग्रंथालय कार्यालय, अहमदनगर येथे भारतीय इतिहासाचे मोती या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा.संतोष यादव या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
अहमदनगरची अक्षर परंपरा-2022 ऑनलाइन व्याख्यानमालेत दोन राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉ.अमोल बागुल हे संकल्पना, समन्वयक व मुलाखतकार म्हणून काम पाहणार असून रविवार 29 मे, 2022 रोजी दू.4-00 वा. ‘अहमदनगर चे काव्यविश्व’ या विषयावर चंद्रकांत पालवे, शशिकांत शिंदे, डॉ.कमर सुरूर, शर्मिला गोसावी या मान्यवर साहित्यिकांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे.
सोमवार, 30 मे, 2022 रोजी सकाळी 10-00 वा ‘अहमदनगरची पत्रकारिता’ या विषयावर शिवाजी शिर्के, सुधीर लंके, महेंद्र कुलकर्णी या मान्यवर पत्रकारांचे चर्चासत्र संपन्न होणार असून याच दिवशी दूपारी 4-00 वा. अहमदनगरचे साहित्यविश्व या विषयावर मोहम्मद आजम व प्र.के.कुलकर्णी या साहित्यिक-समीक्षकांचे चर्चासत्र संपन्न होणार आहे
मंगळवार, 31 मे, 2022 रोजी सकाळी 10-00 वा. ‘अहमदनगरचे ऐतिहासिक वैभव’ या विषयावर भूषण देशमुख व प्रा.अमोल बुचुडे या मान्यवर इतिहास तज्ञांचे ऑनलाईन चर्चासत्र संपन्न होणार असून याच दिवशी दुपारी 4-00 वा. आमची कहाणी…आपली कहाणी या प्रबोधनपर पुस्तकावर लेखिका सौ. प्राजक्ता आव्हाड यांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे.
सोमवार, 6 जून, 2022 रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘झुंज नियतीशी’ पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय लेखिका मेधा देशमुख-भास्करन यांचे ऑनलाइन चर्चासत्र संपन्न होणार आहे. गुगल मिट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब तसेच विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावर या सर्व मुलाखती प्रसारित केल्या जाणार आहे.
28 मे ते 8 जून, 2022 या कालावधीत शासकीय सुट्ट्या वगळून ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शन सकाळी 10-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, त्रिवेणी बंगला, पंपिंग स्टेशन रोड, भुतकरवाडी, महालक्ष्मी उद्यानाशेजारी, अहमदनगर येथे आयोजित या प्रदर्शनाला जास्तीत जास्त रसिक, वाचक व इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच शासकीय ग्रंथालयाचे वर्गणीदार होऊन वाचन चळवळ समृद्ध करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (0241-2430180)या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.