शंभर बोकडं कापली म्हणून कुणी पुन्हा खासदार होत नसतं : किरण काळे

अहमदनगर दि. 26 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते तेव्हा जनता त्याला घरचा रस्ता दाखवते. दक्षिणेला आजवरच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम, बोलघेवडा खासदार मिळाला आहे. मतदार ही चूक येत्या निवडणुकीत दुरुस्त करतील. देशातील जनतेने वेळप्रसंगी भल्याभल्यांचा पराभव केला आहे. युवराज खासदारांना येत्या निवडणुकीच्या मैदानात एखादा सर्वसामान्य, प्रामाणिक, साधा कार्यकर्ता देखील चारी मुंड्या चित करेल. त्यामुळे शंभर बोकड कापली म्हणून कोणी पुन्हा खासदार होत नसतो, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खा. सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.
काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, माजी नगरसेवक संजय झिंजे, काँग्रेस सचिव रोहिदास भालेराव, इंजि. सुजित क्षेत्रे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह कामगार, काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा आयुष्य रुग्णालयाची काँग्रेसने ईन कॅमेरा पोलखोल केल्यावरून किरण काळे यांच्यावर नाव न खासदार विखे यांनी टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार काळे यांनी घेतला. गर शहरात झालेल्या एका कार्यक्रमात फराळा कार्यक्रमांनी जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार एक हलवाई असता. लोकप्रतिनिधी असतात असे वक्तव्य खा. विखेंनी केले होते. त्यावर काळे म्हणाले, खासदार म्हणतात की जेवढे लोक दहा फराळात होते ते माझं तिखट खायला सुद्धा येणार. त्यांचा गैरसमज झाला असावा, की लोक त्यांच्या तिखटा वाचून उपाशी आहेत. म्हणूनच शंभर बोकडांपैकी पन्नास- साठ बोकडाच मटण फेकून द्यायची त्यांच्यावर वेळ आली. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या आवतनाला प्रतिसाद दिला नाही. माणूस फराळ, बोकड खाऊ घातल्याने मोठा होत नाही. तर जनतेची सेवा, विकास कामे केल्याने मोठा होतो. हे त्यांनी लक्षात ठेवावे.
काळे पुढे म्हणाले, नगर शहरातील दहशत संपवण्यासाठी मला खासदार करा असं ते म्हणाले होते. मात्र दहशत करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून ते आता बसले आहेत. निवडणुकीत सेटिंग करून मतदारांना फसवले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिवंगत अनिलभैय्या राठोड यांना देखील त्यांनी फसवले. दक्षिणेतील नेत्यांच्या तीस वर्षांच्या कामांचा तुम्ही हिशोब मागत आहात. तुमच्या खोडीमुळे तालुके उध्वस्त झाले. जिल्ह्याची नासाडी झाली. आता दहशतीला बळ देऊन तुम्ही नगर शहर नासवायला निघाले आहात. अवघ्या तीन वर्षात उड्डाणपूल केल्याचा दावा ते करतात. पुलाचे खरे शिल्पकार कोण हे नगरकरांना माहित आहे. पण यांचं बोलणं म्हणजे, म्हशीला टोणगा झाला तरी तो देखील माझ्या मुळेच झाला असं म्हटल्या सारखे आहे.
काळे पुढे म्हणाले, युवा खासदार म्हणतात की दुसरी दिवाळी २२ जानेवारीला देशात साजरी होईल. यावेळी प्रभू श्रीराम आपला कित्येक वर्षांचा वनवास संपवून प्रधानमंत्री यांच्या हस्ते परत आयोद्येला येतील. खर तर विखेंची जीभ घसरली आहे. प्रभू श्रीरामांचा वनवास संपवण्या इतके पंतप्रधान कधी मोठे झाले ? जिल्हा आयुष रुग्णालयाची शहर काँग्रेसने पोलखोल केल्यानंतर विखे पिता – पुत्रांना थेट दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाकडून कान उघडआणी झाली आहे. म्हणून आता पंतप्रधानांची स्तुती करून आपले पितळ झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र ते करताना प्रभू श्रीरामांनाही त्यांनी पंतप्रधानां पेक्षा मोठे केल्याचे दुर्दैवी असल्याचं काळे यावेळी म्हणाले.