सागर चाबुकस्वारांनी वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेले आरोग्य शिबिर हा कौतुकास्पद उपक्रम – किरण काळे
वाढदिवसानिमित्त भिंगार काँग्रेस आयोजित दंतरोग शिबिरास मोठा प्रतिसाद

भिंगार (प्रतिनिधी): भिंगार काँग्रेसचे युवा नेते सागर चाबुकस्वार यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवित समाजातील विविध घटकांची सेवा केली आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगार मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत दंतरोग तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करीत राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.
भिंगार ज्येष्ठ नागरिक मंचाच्या सहाय्याने भिंगार काँगेसच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काळे बोलत होते. यावेळी सागर चाबुकस्वार यांच्यासह दंतरोग तज्ञ डॉ. अतुल मडावी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, सुभाष होडगे, विवेक प्रभुणे, अशोक पवार, सुधाकर कटोरे, प्रकाश तरवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, तसेच विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, अच्युत गाडे, बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष सारसर, राजु कडुस, नवीन भिंगारदिवे, शामराव जाधव, निलेश तरवडे, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, हनीफ जहागीरदार आदी उपस्थित होते.
यावेळी किरण काळे म्हणाले की, उतार वयामध्ये अनेक शारीरिक आजार उद्भवत असतात. दातांशी निगडीत देखील अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत असतात. अशावेळी त्यांचे योग्य वेळी निदान होवून त्यावर वेळीच उपचार होणे महत्त्वाचे असते. दातांचे आरोग्य उत्तम असणे हे महत्त्वाचे असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चाबुकस्वार यांनी यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केल्यामुळे भिंगारमधील ज्येष्ठ नागरिकांना या शिबीराचा लाभ घेता आला आहे. चाबुकस्वार यांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी चाबुकस्वार यांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना सागर चाबुकस्वार म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा काँग्रेस पक्षाचा संस्कार आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये काम करत असताना पक्षाचा हाच विचार जोपासण्याचा कार्यकर्त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळेच वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबाजीच्या खर्चाला फाटा देऊन या शिबिराचे आयोजन सहकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने केल्याचा आनंद आहे.
यावेळी प्रास्ताविक सुभाष होडगे यांनी केले. आभार बाळासाहेब भिंगारदिवे यांनी मानले. यावेळी दंतरोग तज्ञ डॉ. अतुल मडावी यांच्या साई डेंटल क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये भिंगार मधील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या मोफत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी दातांच्या विविध आजारांचे मोफत निदान करण्यात आले. तसेच पुढील उपचार हे सवलतीच्या व माफक दरात करण्यात येणार असल्याचे डॉ. मडावी यांनी सांगितले आहे.