वाचन प्रेरणा दिन विशेष अधिकारी जोपासत आहेत वाचन छंद…! वाचनाने निर्णय प्रक्रियेत येते गतिमानता – अधिकाऱ्यांच्या भावना

शिर्डी, दि.१५ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. ‘‘ शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणं ही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते. ’’ अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आजपर्यंत केलेले वाचन, सध्या करत वाचत असलेले पुस्तक व एकूण वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
शिर्डी उपविभागीय अधिकारी गोंविंद शिंदे यांनी त्यांच्या वाचन प्रक्रियेविषयी सांगितले की, दैंनदिन महसूली काम करतांना वाचन करण्यासाठी तसा वेळ अभावानेच मिळत असतो. मात्र तरीही वृत्तपत्रातील महत्त्वपूर्ण अग्रलेख, स्तंभलेख यांचे नियमित वाचन करत असतो. मोबाईलच्या माध्यमातून प्रवासात असतांना ही काहीतरी वाचन होत असते. आजच्या सोशल मिडियाच्या जगात मोबाईलपासून थोडा वेळ काढून प्रत्येकानं काहीतरी वाचन करण क्रमप्राप्त आहे.राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, नियमित बैठक देऊन वाचन होत नाही. पण महिने-सहा महिन्यातून जसा वेळ मिळेल तसे पुस्तक खरेदी करून वाचन करत असतो. ‘ॲटलास श्रग्गड’ हे आयन रँड लिखित मुग्धा कर्णिक यांनी अनुदानित केलेले पुस्तक नुकतेच वाचलं. या पुस्तकात जीवनाच्या अप्रतिम तत्वज्ञानाची मांडणी लेखिकेने केली आहे.
संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांनी त्यांच्या वाचनछंदा विषयी सांगितले की, भारताच्या इतिहासाबद्दल जास्त वाचन केलं आहे. पूर्वी इंग्रजी पुस्तके जास्त वाचायचो. आता वपु, पुलं, नेमाडे, सुहास शिरवळकर, सुधा मूर्ती, रंगनाथ पठारे, अनिल अवचट, प्रकाश संत अशा अनेक मराठी लेखकांचं लिखाण मी वाचत असतो. मी गेल्या काही दिवसांत प्रा रंगनाथ पठारे यांचे ‘सातपाटील कुलवृत्तांत’, ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ आणि शरद तांदळेंचं ‘रावण राजा राक्षसांचा’ ही पुस्तके वाचली आहेत. ‘सातपाटील’ या पठारे सरांच्या पुस्तकाने मी खूप झपाटून गेलो. अवजड दिसणाऱ्या या पुस्तकात लेखकानं खूप कलात्मकतेनं व उत्कंठावर्धक शैलीत कथानक गुंफलं आहे.
श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील म्हणाले, लहान असताना वाचलेल्या चांदोबा, चंपक, छोटा दोस्त, इंद्रजाल कॉमिक्स पासून आजवर शिवाजी सावंत, पुल, वपु, विस इत्यादी महनीय लेखकांची अनेक पुस्तकं वाचली आहेत. या सर्व वाचनाने मला मिळालेली प्रेरणाच सातत्याने चांगल काम करण्याची ऊर्जा बनली आहे. शिवाजी सावंत साहेबांची ‘मृत्युंजय’ मला कल्पनाशक्ती व भाषा सौंदर्याचा नितांत सुंदर आविष्कार वाटतो. तर वपुंची लेखणी मला जणू एका महान मनोवैज्ञानिकाचे दर्शन घडवत असते. ‘आपण सारे अर्जुन, गोष्ट हातातली होती, वपुर्झा ही माझी आवडती पुस्तकं आहेत.
कोपरगाव व राहाता तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्या वाचनाविषयी सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात ऐतिहासिक आणि राजकीय साहित्य वाचायला आवडायचे. हल्ली कार्यालयीन कामाच्या व्यापामुळे वाचनासाठी कमी वेळ मिळतो. मात्र उपलब्ध वेळेत कर्मचारी व्यवस्थापन, शिक्षण, रोजगार, ग्रामविकास या विषयाशी संबंधित साहित्य प्राधान्याने वाचतो. नव्या पिढीतील आवडते लेखक अच्युत गोडबोले, संजय आवटे यांच्यासह द्वारकानाथ संझगिरी यांचे प्रासंगिक लेख आवर्जून वाचतो. वाचनामुळे कायम नवी उभारी मिळते.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे नियमित मार्गदर्शन करणारे संगमनेरचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी त्यांच्या वाचनछंदा विषयी सांगितले की, अविनाश धर्माधिकारी लिखित ’७५ सोनेरी पाने’ हे पुस्तक वाचनात आले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यंत आपली जी प्रगती झाली. त्यातील ७५ महत्वाच्या घटनांवर भाष्य करणारे हे पुस्तक सर्वानी वाचलचं पाहिजे असं झालं आहे. भविष्याकडे पाहताना आपला इतिहास डोळ्यासमोर असावा लागतो. एक भारतीय नागरिक म्हणून अभिमान वाटावा. अशा घटना अविनाश धर्माधिकारींच्या नजरेतून पाहणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.
अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीच्या वैचारिक जडणघडणीमध्ये वाचन या प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माझेही शालेय तसेच सेवाकाळातील आयुष्य विविध प्रकारच्या साहित्यकृतींनी समृध्द केलेले आहे. बाबुराव बागुल, गुलजार, आरती प्रभू, रंगनाथ पठारे हे आवडते लेखक-कवी आहेत. सध्या गिरीश कुबेर यांचे ‘एका तेलियाने’ याचे वाचन सुरू आहे.