प्रशासकिय

दिव्यांगांच्या जीवनातील दु:ख, वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवा: -आमदार बच्चू कडू

अहमदनगर दि.12 सप्टेंबर (प्रतिनिधी):- जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्वासाने दिव्यांग जीवन जगत असुन त्यांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. दिव्यांगांना आवश्यक असलेल्या लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करावे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
केडगाव येथील निशा लॉन्स येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य मार्गदर्शक व आमदार बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण गेली 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहे. जीवन जगत असताना दिव्यांगांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात येणे शक्य होत नसल्याने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता प्रशासनाने दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राखीव ठेवावा. दिव्यांगांच्या अडचणी, समस्या दूर झाल्यानंतर हृदयापासून मिळणारे आशिर्वाद लाखमोलाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. मुकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे. अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळांना भेट देऊन तेथील अडचणी समजुन घेऊन त्या, सोडविण्यासाठीही प्रयत्न करावेत.
जिल्ह्यात अनेक दिव्यांग बांधव आहेत. ज्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. दिव्यांगांना शासनाच्या कोणत्या लाभाची आवश्यकता आहे हे पहाण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका यासारख्या ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाचे काम गतीने पुर्ण करण्यात यावे. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभाबाबत तसेच त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्य आराखडा तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे म्हणाले, जिल्ह्यात दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेकविध योजना तसेच उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ दिव्यांग मतिमंद मुलांसाठी 21 बालगृहे असुन त्यामध्ये 1 हजार 1147 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गत पाच वर्षामध्ये दिव्यांगासाठी एकुण तरतुदीच्या पाच टक्के निधीची तरतुद करण्यात येऊन 3 कोटी 48 लक्ष रुपये दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आले. महापालिका तसेच नगर परिषद, पंचायत समित्यामार्फतही पाच टक्के निधी राखीव ठेवत तो दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आाला आहे. दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फतही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगंना साहित्य साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 23 गावांची निवड करत 0 ते 6 वयोगटातील बालकांवन शिघ्र निदान हस्तेक्षेप व उपचार कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांची निवेदने स्वीकारली.

*कार्यक्रम स्थळी विविध विभागांचे मदत कक्ष*
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या मदत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. विभागांच्या असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित दिव्यांगाना या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक या कक्षातून करण्यात आली.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग सघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे