बारावी बोर्ड परीक्षेसाठी कोरोना काळाआधीच्या स्पर्धांचे गुण ग्राह्य धरत खेळाडूंना लाभ देण्याची काँग्रेस क्रीडा विभागाची मागणी

अहमदनगर दि.७ (प्रतिनिधी) : बारावी बोर्ड गुणपत्रक तयार करताना ज्या विद्यार्थी खेळाडूंनी कोरोना काळा आधीच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बक्षिसे मिळविली आहेत अशा खेळाडूंना देखील क्रीडासाठीच्या विशेष गुणांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अहमदनगर शहर काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस क्रीडा विभाग खजिनदार नारायण कराळे, सचिव मच्छिंद्र साळुंखे,संघटक प्रसाद पाटोळे, सरचिटणीस आदिल सय्यद, काँग्रेस क्रीडा विभागाचे आदित्य शिरसागर, बाबू सकट, अमित बडदे, सर्फराज सय्यद, सुरज गुंजाळ, कल्पना देशमुख यांच्यासह खेळाडू केदारी आशिष, निर्मल प्रसाद, मेश्री कुशल, आव्हाड धनंजय आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.
शासनाने नवीन परिपत्रक काढले असून यामध्ये दहावी बोर्डाच्या गुणपत्रिकासाठी सातवी ते दहावीच्या कालावधीमध्ये खेळलेले गुण ग्राह्य धरावेत. तसेच बारावी बोर्डासाठी अकरावी व बारावी या शैक्षणिक वर्षामध्ये खेळलेल्या खेळाडूंचे गुण ग्राह्य धरावेत असे म्हटले आहे. मात्र मागील सुमारे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे अकरावी व बारावीच्या विद्यार्थी खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याची संधीच मिळालेली नाही.
या गोष्टीकडे क्रीडा काँग्रेस विभागाने क्रीडा विभागाचे लक्ष वेधले आहे. याबाबत बोलताना प्रवीण गीते पाटील म्हणाले की, यामुळे खेळाडूंवर अन्याय होत आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकासाठी सातवी ते बारावी या शैक्षणिक कालावधीमध्ये खेळलेल्या क्रीडा स्पर्धांचे गुण बारावी बोर्ड गुणपत्रक तयार करताना ग्राह्य धरण्यात यावे. असे न झाल्यास विद्यार्थी खेळाडू यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक पाहत राज्य शासनाकडे तसे म्हणणे सादर करावे अशी मागणी काँग्रेसच्या क्रीडा विभागाने केली आहे.