राष्ट्रसंत प.पू. आनंदऋषीजी महाराजांनी समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले – किरण काळे
तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने समाधीस्थळी भेट देत करण्यात आले अभिवादन

अहमदनगर दि.२८(प्रतिनिधी) : राष्ट्रसंत परमपूज्य आचार्य आनंदऋषीजी महाराजांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यांची कर्मभूमी ही अहमदनगरसह सबंध देश राहिलेली आहे. सत्य, अहिंसा हा विचार समाजामध्ये अधिक खोलवर रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
आनंदऋषीजी महाराज यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने धार्मिक परिक्षा बोर्ड येथील समाधीस्थळी भेट देत किरण काळे यांनी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, एनएसयुआयचे प्रभारी अनिस चुडीवाला, धीरज गांधी, सुमित बलदोटा, धनेश तलरेजा, अमित सुराणा आदींसह अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
काळे म्हणाले की, नगर ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, साईबाबा, मेहेरबाबा अशी अनेक महान महानुभावांनी नगरच्या पावन भूमीमध्ये कार्य केले आहे. अगदी अलीकडील काळामधील सणाऱ्या आचार्य आनंदऋषीजी महाराजांमुळे देशातील आणि जगातील राष्ट्रसंतांच्या मांदियाळीमध्ये अहमदनगरचा नावलौकिक मोठा झालेला आहे. ही बाब जैन धर्मीयांसह सर्वच समाजाच्या आणि नगरकरांच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
आनंदऋषीजी महाराजांचे अनुयायी हे देशात तसेच जगाच्या विविध कानाकोपऱ्यात मध्ये पसरलेले आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मोठ्या संख्येने श्रावक नगर शहरामध्ये दाखल झाले आहेत. त्या सर्वांचे आम्ही काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत करतो. सकल जैन समाजाचा बरोबरच समाजातील सर्व धर्मीयांमध्ये आनंदऋषीजी महाराजांबद्दल नितांत आदर आणि आस्था आहे, असे यावेळी बोलताना काळे म्हणाले.
मनोज गुंदेचा म्हणाले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी समाजाला दिलेल्या मानवतेच्या शिकवणीमुळे त्यांना समाजाने युगपुरुष म्हणून गौरविले आहे. आज जगामध्ये अशांततेचे वारे पेटलेले असताना आचार्य आनंदऋषीजी यांनी दिलेला संयम आणि शांततेचा संदेश हा जगाला उज्वल दिशेने घेऊन जाऊ शकेल एवढी ताकद त्यामध्ये आहे. आनंदऋषीजींचे विचार आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोज आचरणात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे.
सकाळी नवी पेठेतील जैन स्थानकापासून भव्य शांती यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेमध्ये काळे यांच्यासह मनोज गुंदेचा,माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड हे देखील सहभागी झाले होते.