एकात्मिक शेती पध्दतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न शक्य – तज्ञांचा सूर

राहुरी / प्रतिनिधी —
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवत असलेल्या नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पा च्या अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कानडगाव या ठिकाणी संपन्न झाला. हा कार्यक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, गो संशोधन व विकास प्रकल्पाचे सहाय्यक गो पैदासकार डॉ. महेंद्र मोटे, प्रगतीशील शेतकरी श्री. प्रभाकर धोंडे, तांभेरे येथील प्रगतीशील शेतकरी श्री. ताराचंद गागरे उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये मृदा शास्त्रज्ञ डॉ. ताकटे यांनी शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य कशाप्रकारे सांभाळता येईल तसेच कोरडवाहू भागातील शेतकर्यांनी जलसंधारणाची कामे कशा पद्धतीने करायची याविषयी माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या बागायत क्षेत्रासाठीच्या व कोरडवाहू क्षेत्रासाठीच्या एकात्मिक शेती पद्धती मॉडेल विषयी सविस्तर माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितले की जमिनीचे आरोग्य एकात्मिक शेती पद्धतीमुळे अबाधित राहते. डॉ. महेंद्र मोटे आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी गांडूळ खत कसे तयार करायचे व त्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी व विक्रीसाठी कशा पद्धतीने करता येईल याविषयी माहिती दिली. मुरघास तयार करण्यासाठी शेतकर्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे व मुरघास तयार करण्यासाठी कोणत्या पिकांचा वापर करायचा याविषयी मार्गदर्शन केले तसेच मुक्त गोठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा होतो यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मोटे यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये शेळीला रेफ्रीजिरेटर व कुक्कुटपालनाला एटीएम मशीन संबोधले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे संशोधन सहयोगी श्री. विजय शेडगे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे प्रक्षेत्र सहाय्यक श्री. किरण मगर यांनी तर आभार प्रक्षेत्र सहाय्यक श्री. राहुल कोऱ्हाळे यांनी मानले. तांत्रिक मार्गदर्शन सत्र पूर्ण झाल्यानंतर श्री. मधुकर गागरे यांच्या मुक्त गोठा व डाळिंब बागेमध्ये क्षेत्र भेटीचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्या मध्ये चर्चासत्राचे आयोजन झाले. कार्यक्रमासाठी तांभेरे व कानडगाव येथील ६० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.