नगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह संलग्नित सुसज्ज रुग्णालयासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुखांना किरण काळेंचे साकडे

मुंबई दि.२४(प्रतिनिधी): नगर शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ती उभी राहिली आहेत. नगरसाठी शासकीय महाविद्यालयासह संलग्नित सुसज्ज रुग्णालय मंजूर करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साकडे घातले आहे. ना. देशमुख यांनी यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.
आज सकाळी मुंबईत देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी काळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
अहमदनगर महानगरपालिकेचे स्वतःचे हॉस्पिटल नसल्यामुळे कोरोना महामारी काळात नगरकरांचे अतोनात हाल झाले आहेत. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास या शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नगरकरांना उपयोग होऊ शकतो असे म्हणत नगरकरांची ही प्रलंबित मागणी मान्य कराच असा आग्रह यावेळी ना.देशमुख यांच्याकडे काळे यांनी धरला.
याबाबत अधिक माहिती देताना किरण काळे म्हणाले की, ना. देशमुख यांच्या सूचनेवरून चार तज्ञ प्राध्यापकांच्या समितीने नगरला प्रत्यक्ष भेट देऊन जानेवारी महिन्यातच या संदर्भातला प्राथमिक अहवाल संचलनालयाने सादर केलेला आहे. यामध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही संचलनालयात सुरु असल्याची माहिती कालच मंत्रीमहोदयांनी विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.
महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खाते हे आमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे. शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आम्ही आमच्या पक्षाचे नेते आणि या खात्याचे मंत्री ना. देशमुख यांच्याकडे नगरकरांसाठी या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत मागणी केली असून आग्रह धरला आहे. ना. देशमुख यांनी यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्याकडे देखील किरण काळे यांनी ही मागणी केली असून ना.थोरात, आ.पटोले या दोघांनीही ना.देशमुख यांच्याशी यावर चर्चा करून नगरसाठी ही मान्यता मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. नगरला वैद्यकीय शिक्षण महाविद्याय व नियोजित संलग्न हॉस्पिटलमुळे जिल्हा रुग्णालया बरोबरच नगर शहरामध्ये शासनाचे अजून एक सुसज्ज असे हॉस्पिटल यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत शेवटपर्यंत मी पाठपुरावा करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.