अहमदनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करणारे सहकार सम्राट शंकरराव कोल्हे यांचे निधन दुःखद आहे:गृहमंत्री दिलीप वळसे
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली

अहमदनगर दि.१६ (प्रतिनिधी)
कृषी, फलोत्पादन, सहकार अशी विविध मंत्रिपदे भूषविलेले राज्याचे माजी मंत्री, अहमदनगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करणारे सहकार सम्राट शंकरराव कोल्हे यांचे निधन दुःखद आहे.
शेती, सहकार आणि प्रामुख्याने साखर क्षेत्राचे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. या क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले. शेतकर्यांना सहकारातून विकासाचा मार्ग त्यांनी दाखविला.
आदरणीय शंकरराव कोल्हे साहेबांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. नुकताच त्यांच्याशी पत्ररूपाने हृदय असा संवाद घडला होता. या पत्रातील आत्मीयता व सहजपणा आठवून भावना उचंबळून आल्या.
वयोमान आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे शंकररावांचे घराबाहेर पडणे बंद झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील व्यस्ततेमुळे इच्छा असूनही त्यांची भेट होऊ शकली नाही याची हूरहूर मनाला आहे. पण आमच्यातील जिव्हाळ्याच्या आठवणींना या पत्ररूपी भेटीने उजाळा मिळाला. हे अखेरचे पत्र मनःपटलावर कायम कोरलेले राहील. आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली!