दिवाळखोरीत निघालेल्या बँकांमधील ठेवी संचालक आणि संबंधित कर्मचारी यांच्या मालमत्ताचा लिलाव करून वसूल करा- दिपक कांबळे

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
पाथर्डी -दि.१६ फेब्रुवारी
दिवळखोरीमध्ये निघालेल्या बँकांमधील ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा हा संबंधित बँकेच्या संचालक आणि संबंधित कर्मचारी यांची मालमत्ता लिलावात काढून त्याची विक्री करून परत करावा,अशी मागणी स्वराज्य माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री व रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.
राज्यातील बऱ्याच नावाजलेल्या बँका या फक्त संचालक आणि बँक कर्मचारी यांच्या गलथान आणि मनमानी कारभारामुळे अडचणीत आल्या आहेत. पीएमसी बँक,जिजामाता सहकारी बँक,भुदरगड पतसंस्था, हरिहरेश्वर बँक यासारख्या अजूनही अनेक बँका आहेत ज्यामध्ये लाखो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची कमाई ठेवली होती परंतु या बँकेच्या संचालक आणि भ्रष्ट कर्मचारी यांनी लाखो ठेवीदारांच्या पैश्यावर डल्ला मारला आहे. या ठेवी परत मिळत नाहीत म्हणुन हजारो ठेवीदारांनी आत्महत्या केल्या आहेत याला जबाबदार कोण?
जर एखाद्याने कर्ज घेतले असेल आणि त्या कर्जाची परतफेड करायला जर उशीर झाला किंवा परतफेड नाही केली तर बँकांना त्या कर्जदाराची मालमत्तेचा लिलाव करून आपली रक्कम वसुल करते,तसेच कर्जदाराकडून जर रक्कम वसुल झाली नाही तर जामीनदार किंवा कर्जदाराच्या नातेवाईक यांच्याकडून वसूल करतात. पण याउलट जर ठेवीदाराच्या ठेवी जर बुडल्या तर तेव्हा का संचालक, कर्मचारी यांच्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवी वसूल करत? कारण बऱ्याच बँका आज डबघाईला आल्या आहेत याला फक्त जबाबदार संचालक आणि कर्मचारी जबाबदार आहे.संचालकाच्या स्वतःच्या,नातेवाइकांच्या नावे बरीच बोगस कर्ज प्रकरणे केली जातात आणि जनतेचा पैसा हडपला जातो.आज सर्वसामान्य कर्जदाराचे एकतरी कर्ज माफ केले आहे किंवा वसूल केले नाही अशी एकही घटना घडली आहे असे दाखवा.या उलट मेहुल चोक्सी,निरव मोदी,विजय मल्ल्या यासारख्या कर्जबुडव्याचे ६८००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.अलीकडेच गुजरातच्या एका शिपिंग कंपनीला २५००० कोटी बोगस कर्ज वाटले, हेच कर्ज सर्वसामान्य जनतेने बुडवले असते तर ? आज १ लाख रुपयांचे जरी कर्ज असले तरी बँका या दुप्पट वसूल करतात पण तोच प्रमाणिकपणा ठेवी परत करताना दाखवतात का?
जेव्हा कर्जप्रक्रिया केली जाते तेंव्हा सहकार कायदा बासनात गुंडाळला जातो, तुम्ही कर्जदाराचे सिबील बघता,कोरे धनादेश घेता,कोरे स्टॅम्पपेपर घेता,मालमत्ता तारण घेता,आणि वर जामीनदारही घेता पण या उलट जर तुम्ही ठेवी ठेवताना बँक संचालक,कर्मचारी यांचे काही बघता का? का त्यांच्याकडून कोऱ्या स्टँप पेपरवर सह्या घेता,कोरे चेक घेता,मालमत्ता घेता.? जर असे केलं तर आज एकही बँक दिवाळखोरीत निघाली नसती आणि लाखो ठेवीदारांचे पैसे बुडाले नसते. कळस म्हणजे निबंधकाला हाताशी धरून त्यांना पाकीट देऊन बेकायदेशीर वसुली दाखले घेऊन कर्जवसुली केली जाते पण तेच निबंधक ठेवीदारांचे पैसे द्यायच्यावेळी ठेवीदारांना पाठ दाखवतात.जितका प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठ पणा कर्ज वसूल करताना दाखवता तितकाच जर ठेवी वसूल करताना दाखवला तर आज एकाही बँकेचा ठेवीदारांना चुना लावण्याचे धाडस होणार नाही .आणि शासनानेही जसे कर्जवसुली करण्यासाठी कायदे आणि यंत्रणा निर्माण केली आहे तशीच यंत्रणा आणि कायदे ठेवी परत मिळण्यासाठी कराव्यात ,अशीही मागणी दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच ज्याप्रमाणे सरकारने अध्यादेश काढून बँकांची कर्जवसुली पोलीस संरक्षणात करावी असा आदेश काढला आहे त्याचप्रमाणे बँकांच्या ठेवीपण पोलीस संरक्षणात वसूल कराव्यात असा पण आदेश काढला पाहिजेत,तसेच भविष्यात ज्या बँकांच्या ठेवी अडकल्या आहेत त्या बँकांच्या संचालक ,कर्मचारी आणि संबंधित निबंधक यांच्याघरासमोर ठेवीदार आणि सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन व्यापक आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिपक कांबळे यांनी शासनाला दिला आहे.