अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोडवरील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या भीमा निकाळजे (वय 29) या तरुणाची कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून निर्दयी हत्या करण्यात आली आहे. नगर-दौंड रोडवरील सुरज हॉटेलसमोर ही घटना घडली असून, आरोपी समीर शेख याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी सुमारे दहा वाजून पंधरा मिनिटांनी भीमा निकाळजे यांनी आपले कामाचे पैसे मागण्यासाठी समीर शेख याला भेटले. या वेळी पैसे देण्यास नकार देत समीर शेख याने निकाळजे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता न राहता त्याने फरशी टाकून निकाळजे यांच्या डोक्यावर गंभीर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या भीमा निकाळजे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद मृतकाची पत्नी शलाका भीमा निकाळजे यांनी दिली असून, तिच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी समीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सुरज हॉटेलच्या आत घडूनही पोलिसांनी ती हॉटेलबाहेर घडल्याचे दाखविल्याने संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास डीवायएसपी टिपरसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पीडित कुटुंबीयांनी टिपरसे यांची भेट घेऊन निष्पक्ष तपासाची मागणी केली. टिपरसे यांनी “या प्रकरणात कोणालाही अन्याय होऊ दिला जाणार नाही, तपास पारदर्शक पद्धतीने केला जाईल,” असे आश्वासन दिले. दरम्यान, पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन आरोपी समीर शेख याचा भाऊ झहीर शेख यालाही या प्रकरणात सहआरोपी म्हणून गुन्ह्यात सामील करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करताना सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, शलाका निकाळजे, सचिन पवार, आरती निकाळजे, छाया निकाळजे, रमेश निकाळजे, गणेश मस्के, ज्योती पाटोळे, संतोष गायकवाड, रावसाहेब पाटोळे, दिलीप निकाळजे, विकी म्हस्के, शुभम पारधे, रमेश निकाळजे, सनी गायकवाड, मीना म्हस्के, अशोक म्हस्के आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा