68 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या!
अहमदनगर (महेश भोसले) नगर एलसीबीने दणकेबाज कामगिरी करत.फरार असणाऱ्या 68 गुन्हेगारांच्या मुसक्या अवघ्या एका आठवड्यात आवळल्या आहेत.या कामगिरीची जिल्ह्यात चर्चा असून यामुळे अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,कोणी खून करुन, तर कुणी दरोडा टाकून पळाला. अनेक वर्षापासून पोलीस यंत्रणेला गुंगारा देऊन ओळख लपून खुलेआम वावरणाऱ्या फरार गुन्हेगारांना नगर पोलिसांनी दणका देत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एसपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये आठवडाभरात ६८ फरारी आरोपींना जेरबंद करण्यात नगर एलसीबीने यश मिळविले आहे.
न्यायालयाने जिल्ह्यातील ४५ फरार आरोपी चे जाहीरनामे प्रसिद्ध करून त्यांना फरार घोषित केले होते. तसेच न्यायालयात हजर न राहिल्यामुळे १६८ आरोपींविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट काढण्यात आले होते. या फरार आरोपींना अटक करणे तसेच स्टॅंडिंग वॉरंट बजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने १८ ते २६ जानेवारी या काळात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये १५ फरार आणि स्टॅंडिंग वॉरंट बजावलेल्या ५१ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मागील वीस वर्षापासून फरार आरोपीनाही अटक करण्यात आली आहे.