राजकिय

सारसनगर प्रभागातील रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – किरण काळेंचा इशारा

सारसनगर प्रभागातील रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – किरण काळेंचा इशारा

अहमदनगर दि. 29 जुलै (प्रतिनिधी) : सारसनगर, विनायक नगर प्रभाग क्र. १४ मधील महालक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचे काम मागील मे महिन्यापासून रखडले आहे. आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त, शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला. फोटोसेशन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही. त्यातच पावसामुळे सदर रस्त्यावर चिखल झाल्या मुळे नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने सदर रस्त्याचे काम पूर्ण करा. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला दिला आहे. यावेळी काळे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सदर नागरी प्रश्नाला वाचा फोडली.
याबाबत काळे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदन पाठविले आहे. तसेच मनपा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. काळे यांनी म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांनी काँग्रेसकडे परिसरातील समस्यांच्या तक्रारी केल्या. म्हणून मी समक्ष पाहणी केली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, विकास गुंदेचा आदी उपस्थित होते.
काळे यांनी निवेदन म्हटले आहे की, मे महिन्यात रस्ता खोदण्यात आला. मात्र कामाला आजतागायत सुरुवात नाही. धक्कादायक म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा शुभारंभ झाला. सदर प्रभाग हा आमदारांचा आहे. स्वतःचा प्रभाग असून देखील जर त्यांच्याच प्रभागात रस्त्यांची, नागरी सुविधांची दयनीय अवस्था असेल तर शहरातील अन्य भागांमधील समस्यांबाबत विचार न केलेलाच बरा. नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र स्थानिक राजकीय नेतृत्वाची दहशत असल्यामुळे कोणीही मनपाकडे लिखित तक्रार अथवा कॅमेऱ्या समोर येऊन आपली व्यथा मांडण्यास धजावत नाही. नागरिकांनी भयमुक्त होत आपल्या समस्या मांडाव्यात, काँग्रेस त्यांना संरक्षण देईल, असे आवाहन काळे यांनी यानिमित्ताने नगरकरांना केले आहे.
काळे यांनी पुढे म्हटले आहे की, पाऊस सुरू असल्यामुळे काम ठप्प असल्याचे कारण सांगितले जाते. मात्र हे धादांत खोटे आहे. मे महिन्यात रस्ता खोदला. त्याच वेळी काम सुरू केले असते तर पावसाळ्या पूर्वीच पूर्ण झाले असते. माञ मनापाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या मनस्ताप, गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरामध्ये अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांचे पायी चालणे, दुचाकीवरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
काळे यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तातडीने सदर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा. मंजूर इस्टिमेट, स्पेसिफिकेशन्स प्रमाणे काम करण्याची दक्षता घ्या. सक्षम प्राधिकरणाकडून टेस्ट रिपोर्ट घ्या. काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल अदा करु नका.
उद्यानाची दुरावस्था दूर करा :
यावेळी काळे यांनी याच परिसरातील मनपाच्या उद्यानाची नागरिकांच्या मागणीवरून पाहणी केली. सदर उद्यानामध्ये नागरिकांच्या पैशातून लाखो रुपये खर्च करुन पेव्हींग ब्लॉक, व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र उद्यानाची दुरावस्था झालेली असून यामुळे मनपाने खर्च केलेला निधी पूर्णतः वाया गेला आहे. स्थानिक नागरिक या उद्यानाचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू शकत नाहीत. सदर उद्यान हे तातडीने सुस्थितीत आणा. दोन्ही मागण्या पुढील पंधरा दिवसांच्या आत मान्य न केल्यास काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा काळे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे