खतांची लिंकिंग केल्यास होणार कठोर कारवाई शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या संबंधित कंपनी व विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. ५ जुलै (प्रतिनिधी ):- खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरणी पूर्ण झालेली आहे.शेतकऱ्यांकडून रासायनिक खताची मागणी वाढत आहे. खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपनी व विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधे घेण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे गैरप्रकार करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या संबंधित कंपनी व विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
राजस्व सभागृहात कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपनी प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, खत विक्रेते जिल्हा अध्यक्ष सतीश मुनोत तसेच सर्व तालुका खत विक्रेते पदाधिकारी आणि खत कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, किरकोळ खत विक्रेते किंवा डीलर यांना खताची बळजबरी करणाऱ्या कंपनीची नावे पुरेशा पुराव्यासह विक्रेते यांनी सादर केल्यास त्या कंपनीवर पुराव्याच्या आधारे तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून मुबलक प्रमाणात खतांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून टंचाई भासणार नाही. तसेच टंचाई निर्माण झाल्यास युरिया व डीएपी या खतांचा संरक्षित साठा केलेला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी यावेळी दिली.