राजकिय

हिंद सेवा मंडळाची जागा घशात घालण्याचे कारस्थान उघडे पडल्याने दिशाभूल करणारे खुलासे – किरण काळे मंडळाच्या शाळेचा श्वास किरण काळे मोकळा करत असताना जगताप, त्यांचे प्रवक्ते कुठे होते ? काळे यांचा सवाल

अहमदनगर दि. 19 जानेवारी (प्रतिनिधी) : हिंद सेवा मंडळ भूखंड प्रकरणात माझ्यासह विरोध करणाऱ्या हितचिंतकांचे यात कुठलेही राजकारण आणण्याची इच्छा आणि गरज नाही. शहरातली विविध जमीनी हडपू इच्छिणाऱ्या विविध भूखंड माफीयांच्या अनेक ताबेमारीचे प्रकार सुज्ञ नगरकरांना माहित आहेत. शहरातील ताबा गॅंग कोण चालवते हे जग जाहीर आहे. हा प्रश्न नगर शहरातील तरुणांच्या तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी उभारलेल्या एका महान शिक्षण संस्थेच्या भविष्याशी निगडित आहे. केवळ म्हणूनच जीवा वरील धोके पत्करून ही लढाई मी प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने लढतो आहे. केवळ आयुर्वेद महाविद्यालया प्रमाणे हिंद सेवा मंडळाची जागा घशात घालण्याचे माजी आमदार अरुण जगताप यांचे कारस्थान उघडे पडल्याने जगताप यांच्या मंडळातील प्रवक्त्यांनी दिशाभूल करणारे खुलासे केल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, माझ्यासह याला विरोध करणाऱ्या प्रामाणिक विश्वस्त, अजीव सभासद यांच्या या नैतिक संघर्षाला राजकीय म्हटल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. दलाली करणाऱ्यांच्या पापाला इतिहासाने कधीही माफ केलेले नाही. याची नोंद माझ्यावर बिनबुडाचे, खोटे आरोप करणाऱ्यांनी घ्यावी. मंडळाचे काही पदाधिकारी ताबा मागणाऱ्या जगताप व हर्षल भंडारी या जोडगळीचे प्रवक्ते म्हणून काम करत असल्याची आमची टीका मंडळाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी साधार खरी ठरवली आहे.
हेच पदाधिकारी जेव्हा हिंद सेवा मंडळाचेच आदर्श शिक्षक असणारे हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा कुठे लपून बसले होते ? मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, किरण काळे कोण आम्ही ओळखत नाही. त्यांना मी आठवण करून देतो की होय मीच तो किरण काळे ज्याने मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयाला जेव्हा अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी विळखा घातला होता तेव्हा मी आणि शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात जीवावर बेतणारी आंदोलने निर्भीडपणे करून शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा श्वास मोकळा केला. मंडळाच्या शाळेच्या शंभर मीटर आवारातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली नाही तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर त्यांना कारवाई करण्याकरिता जागे करण्यासाठी ढोल बाजाओ आंदोलननाचा ईशारा देणारा मीच तो किरण काळे आहे. त्यावेळी ४८ तासांच्या आत मंडळाच्या शाळेचा आवार कारवाई होत स्वच्छ झाला. प्रशासन जागे झाले. मात्र मंडळाचे कोणीही पदाधिकारी मंडळाची शाळा अडचणीत असतानाही आणि ते पदाधिकारी मंडळाचे सदस्य असतानाही जागे झाले नव्हते. मी आणि काँग्रेस कार्यकर्ते मंडळाचे सदस्य देखील नसतानाही सर्व काही अंगावर घेत मंडळाच्या शाळा सुरक्षित करण्यासाठी लढत होते आणि लढत राहू. आम्ही ते आमचे कर्तव्यच समजतो. त्यासाठी सदस्य असल्याचा कागदपत्री तुकडा माझ्याकडे असायलाच हवा याची मला जरूर वाटत नाही. तेव्हा माझ्यावर सर्व संचालकांच्या वतीने गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारे, कायद्याचे ज्ञान पाजळणारे मंडळाचे पदाधिकारी तज्ञ वकिल आणि जागेचा ताबा मागणारे शहराचे माजी आमदार अरुण जगताप यांनी मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीच कायदेशीर भूमिका का घेतली नाही, असा पलटवार काळे यांनी केला आहे.

या प्रकारा बद्दल तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शहरातील विविध भूखंड माफिया, दलालांची मनस्थिती भयग्रस्त झाली आहे. मंडळाने केलेले काही खुलासे धक्कादायक व चिंताजनक आहेत. किरण काळे म्हणाले, त्यातील काही मोजक्या मुद्द्यांकडे माध्यमांचे आणि जनतेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. ते म्हणाले, मंडळाच्या वर्तमान संचालकांना मंडळाची मालमत्ता राखता येत नसल्याने ही ३.२९ एकर जागा बिल्डर जोडीला देत असल्याची हतबल होत मानद सचिव संजय जोशी यांनी माध्यमांसमोरच कबुली दिली. यापूर्वी सुमारे ८ भूखंडाचे देखील मंडळ संरक्षण करू शकलेले नाही. मालमत्ता राखता येत नाहीत म्हणून त्या धंदेवाईक लोकांच्या घशात कवडी मोलाने घालणे योग्य आहे काय ? गुन्हेगार लोकांनी यापूर्वी लाटलेल्या मंडळाच्या मालकीच्या जागा परत मिळवण्यासाठी कोणत्या कायदेशीर कारवाया मंडळातील तज्ञ पदाधिकारी वकिलांनी आजवर केल्या, याचा खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेत का केला नाही, असे काळे यांनी म्हटले आहे.
काळे पुढे म्हणाले, यापूर्वी ताबा मागणाऱ्यांनी अत्यंत मोघम भाषेत जागेचा मोबदला देऊ म्हटले आहे. भूखंडावरील हा दरोडा आम्ही समाजासमोर आणला. त्यानंतरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी २२५ कोटींच्या जागेसाठी जोडी कडून २५ कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु तसे कोणतेही लेखी पत्र दिलेले नाही. पैसे कसे, कधी देणार, हे सुद्धा स्पष्ट नाही. २५ कोटी बांधकाम स्वरूपात देऊ म्हणाल्याचे पदाधिकारी तोंडी सांगत आहेत. मराठीत म्हण आहे की “लाबाडा घरचे अवतान जेवल्या शिवाय खरे नसते” हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोला काळे यांनी लगावला आहे. ही जमीन मुळ तकिया ट्रस्टची आहे. ती विकत घेणाऱ्या लुनिया – मुनोत फर्मने जगताप – भंडारी दुक्कलीशी या जागेच्या खरेदी बाबत साठेखत केलेले आहे काय ? असल्यास किती रकमेचे ? काय मुदतीचे ? याचा कोणताच खुलासा मंडळाच्या तज्ञ वकीलांनी केला नाही. कोणताही कायदेशीर पुरावा हातात नसताना मंडळाचे सत्ताधारी संचालक सांगतात की, लुनिया – मूनोत यांनी ही जागा जगताप – भंडारी जोडीला विकण्याचे ठरवले आहे.
काळे म्हणाले, या जागेचे मूल्य २५ कोटी आहे, हे कशाच्या आधारे ठरवले, याचा खुलासा कोणीच केला नाही याकडे काळे यांनी लक्ष वेधले आहे. मुळात या जागेचे सरकारी व बाजारमूल्य हे जगताप – भंडारी देत असलेल्या कथित २५ कोटीं पेक्षा किमान ९ पट जास्त आहे. जागेचे २५ कोटी मूल्य कशाच्या आधारे ठरवले. हा तथाकथित आकडा सांगून ते स्पष्ट दिशाभूल करीत आहेत. मंडळाला विधी महाविद्यालय काढायचे आहे असे मंडळातील वकिलांनी सांगितले. यासाठी मंडळाने अर्ज केल्याचे आम्हाला ठाऊक आहे. परंतु पुणे विद्यापीठाने खरोखरच परवानगी दिली असेल, तर त्याचे पुरावे देणे आवश्यक होते. ते का टाळले ? याचे उत्तर द्यावे.
संस्थेला शैक्षणिक उद्दिष्टासाठी पैसेच हवे असतील तर अशा जमिनीबाबत संयुक्त व्यवस्थापनाचे प्रस्ताव अन्य नामांकित शिक्षण संस्थांना देऊन शैक्षणिक प्रकल्प या जागेवर उभे करता आले असते असे काळे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून इंजीनियरिंग, नर्सिंग, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवसायाभिमुख व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस, मॅनेजमेंट कॉलेज असे रोजगाराभिमुख शैक्षणिक उपक्रम मंडळाला सुरू करता आले असते.
किरण काळे म्हणाले, मंडळाचे माजी विद्यार्थी प्रख्यात प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांनी मंडळाच्या दादा चौधरी शाळेसाठी एक कोटी रुपये देणगी देऊन या शाळेचा अक्षरश: उद्धार केला. त्यांचे मनापासून आभारच मानले पाहिजेत. मंडळाच्या ताब्यातील सध्याच्या जगताप – भंडारी यांच्या घशात चाललेल्या जागेवर भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी मोठा आर्थिक सहयोग देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी आधीपासूनच दलाली करणाऱ्या एकाने त्यांची दिशाभूल केली. ही जागा वादात आहे असे सांगून येथे काही शैक्षणिक प्रकल्प होणार नाही असे सांगून लगेच मिळणारे सुमारे काही कोटी रुपये घालवून मंडळाचे नुकसान केले. एकीकडे पैसे नाहीत म्हणायचे, दुसरीकडे काही दलालांना खोके मिळवायचे असल्याने मिळणारी देणगी पळवून लावायची असा जगताप दलालांचा खाक्या आहे.
वस्तुस्थिती लपवली जात असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. ते म्हणाले, मंडळाच्या मानद सचिवांनी ब्रिजलाल सारडा यांच्या घरी अरुण जगताप आले होते आणि तेथे या जागे बाबत बैठक झाल्याचे सांगितले. परंतु सारडा यांनी आणि अन्य पाच संचालकांनी लेखी पत्रात त्यांची भूमिका स्पष्ट मांडली. परंतु पत्रकार परिषदेत सारडा यांचा नाम उल्लेख करून स्वतःच्या अंगावर उडालेल्या चिखलाचे शिंतोडे इतरांवर उडवण्याचा प्रयत्न वर्तमान पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की हिंद सेवा मंडळातील मान्यवर आणि प्रतिष्ठित लोकांनी या जमीन व्यवहाराला आक्षेप घेतलेला नाही. मग नकार देणारे मंडळाचे कोण आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो.
जनाची आणि मनाची लाज बाळगणाऱ्या, हिंद सेवा मंडळाच्या संस्थापकांची जीवनदृष्टी अनुसरणाऱ्या सारडा बंधू, सामजिक – राजकीय नेते अनंत देसाई, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक मकरंद खेर सर आदी ६ निर्भीड संचालकांचे आम्ही शहर काँग्रेस व मंडळाच्या खऱ्या आणि प्रामाणिक हितचिंतकांच्या वतीने पुन:श्च जाहीर अभिनंदन करतो, असे काळे म्हणाले.
सर्व सभासदांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. वस्तुतः मंडळाच्या संस्थापकांनी सर्व कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांना दिलेला मताधिकार काढून घेऊन त्यांच्या जागेवर आपले सोयरे – धायरे, दुकानातले नोकर, नातेवाईक यांना मंडळाचे सदस्य म्हणून वर्तमान सत्ताधाऱ्यांनी आणून बसवले आहेत. हिम्मत असेल तर सर्वांना अधिकार परत द्यावा. मतदान गुप्त पद्धतीने घेऊन दाखवावे असे किरण काळे यांनी जाहीर आव्हान दिले आहे. तसेच मंडळाला यांनी खाजगी कंपनी केले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या चारित्र्यसंपन्न लोकांसाठी व माजी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी सभासदत्व खुले करून देण्याची हिम्मत यांनी दाखवावी असे आव्हान काळे यांनी दिले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे