बोल्हेगाव फाटा येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा,पुरवठा विभागाची कारवाई

नगर २२ जून ( प्रतिनिधी):-दि.२१/०६/२०२२ रोजी अन्नधान्य वितरण अधिकारी स्वस्त धान्य दुकान तपासणी करिता जात असताना मौजे-बोल्हेगाव फाटा नगर मनमाड रोड येथे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये समक्ष जाऊन पाहणी केली असता. एका शेडमध्ये एक इसम अनाधिकृतरित्या व्यवसायिक वापराचा गॅस सिलेंडर मधून मशिनच्या साह्याने गॅस काढून प्रवासी रिक्षा मध्ये बेकायदेशीररित्या भरत असताना मिळून आल्याने सदरील ठिकाणी तात्काळ छापा टाकला.या ठिकाणी एक प्रवासी रिक्षा मिळून आली. व त्याचा चालक तेथून पसार झाला, तसेच रिफिलिंग मशीन,रबरी पाईप,वजन काटा,१२ भारत गॅस,३ इण्डेन कंपनीच्या टाक्या मिळून आल्या.त्यांचा पंचांसमक्ष पंचनामा व सुपुर्तनामा पंचां समक्ष करून सुरक्षिततेच्या दृष्टीने मे.कराचीवाला गॅस एजन्सी अहमदनगर यांच्या ताब्यात गॅस टाक्या देण्यात आल्या. सदरील व्यक्ती यांनी बेकायदेशीररित्या विनापरवानगी अवैधरीत्या व्यवसायिक वापराच्या गॅस टाक्यांमधून गॅस रिफीलींग करून मशिनच्या साह्याने प्रवासी रिक्षा मध्ये भरत असल्याने लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस(रेग्युलेशन ऑफ सप्लाय अॅण्ड डिस्ट्रीब्यूशन ऑर्डर २००० मधील नियमाचा भंग केला असल्याने तसेच सदर व्यक्तीने मानवी जीवन धोक्यात येईल व व्यक्तीला धोका अगर नुकसान पोहचेल अशाप्रकारे ज्वालाग्राही पदार्थ सुरक्षतेची काळजी न घेता विनापरवाना विक्रीसाठी जवळ बाळगला आणि त्याची बेकायदेशीररीत्या विक्री करत होता म्हणून त्याच्या विरुद्ध भादंसं १८६० चे कलम २८५,२८६,३३६ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३,७,८ मधील तरतुदीचा भंग नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जयंत कान्हू भिंगारदिवे प्र.पुरवठा निरीक्षक सावेडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.गिरीश मधुकर गायकवाड पुरवठा निरीक्षक माळीवाडा व पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी केली आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.