कौतुकास्पद

स्त्रियांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा आदर्श घ्यावा – उमेश चव्हाण

पुणे दि. 13 डिसेंबर (प्रतिनिधी )- स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या अनेक बातम्या आपल्याला दररोज वाचण्यास मिळतात. भाऊ, वडील, नवरा, सासरे अशा नात्यातीलच अनेकांची मालकी स्त्रीवर मिळते. स्त्रीया उच्चशिक्षित झाल्या तरी त्यांना दुय्यम लेखले जाते. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे, स्त्रियांनी खंबीर व्हावे, धाडसी बनावे यासाठी समस्त स्त्रियांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील डॅशिंग धडाकेबाज पोलीस अधिकारी आहेत. त्यांना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सेवा सन्मान प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, रवींद्र चव्हाण आदि यावेळी उपस्थित होते.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, आपल्या देशात स्त्रीला देवी म्हणून पूजले जाते. तिला एकीकडे सर्वश्रेष्ठ समजले जाते, तर दुसरीकडे हुंड्यासाठी जाळून मारले जाते. मुली होऊ लागल्या की, नवरा तिला ‘पापीन’ समजतो. सर्व खापर स्त्रीच्या माथी फोडले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि अंधश्रद्धेचा प्रभावाला स्त्री बळी पडते. अशावेळी दोष केवळ स्त्रीच्या वाट्याला येतो. मागच्या दोन दशकांत लिंगचाचणी करून कितीतरी मुली गर्भात मारल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. लाखोंच्या संख्येत भ्रूणहत्या केल्या गेल्या आहेत. परिणामी मुलींचे प्रमाण कमी झाले. समाजात याचे भयंकर अनिष्ट परिणाम दिसत आहेत. आपली अशी मानसिकता बदलली नाही, हे प्रकार थांबविले नाहीत तर त्याचे विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. मुली कुठेही कमी नाहीत हे उच्च अधिकार पदावर असलेल्या स्मार्तना पाटील यांच्याकडे बघून लक्षात येते.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, या देशात स्त्रीमुक्तीची चळवळ महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, डॉ. अनी बेझंट आदींनी सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला पुरुषांइतका समानतेचा अधिकार बहाल केला. त्यामुळे स्त्रीच्या कपाळावरचा काळा डाग पुसला गेला. आज सुशिक्षित महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करीत आहेत. महत्त्वाची पदे भूषवित आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी गाव, खेडे, झोपडपट्टी, पालं, शहरांचा काही भाग बघितला की मन अस्वस्थ होते. स्त्रियांची ससेहोलपट सुरूच आहे. राजकारणात महिलांना आरक्षण दिले. त्यांच्यावतीने कारभार मात्र बावरे झालेले नवरे करताना आपण बघतो, हे थांबायला हवे. हे सर्व बदलण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन व घरात स्त्रीला समान दर्जा देणे आपल्या हातात आहे. जागतिक महिला दिन नुसता साजरा करण्यापेक्षा आपापल्या परीने स्त्रीचा विकास, हा ध्यास घेऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे. तशी सुरुवात स्वत:पासून करणे अतिमहत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अपर्णा मारणे साठ्ये यांनी केले तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे