बिकट परिस्थितीत असलेल्या शंभर टक्के मनोविकलांग मुलांच्या घरी मदत घेऊन पोहचले शिक्षक नेते बोडखे मनोविकलांग मुलांना जवळ करुन दिली नवीन कपड्यांची भेट व कुटुंबाला अन्न-धान्य, किराणा साहित्य

अहमदनगर दि. 7 डिसेंबर (प्रतिनिधी)- एका कुटुंबात शंभर टक्के मनोविकलांग असलेली दोन प्रौढ मुले, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक अशा परिस्थितीत दिव्यांग मुलाच्या वडिलांच्या हातातून गेलेले काम व दुसऱ्या कामाच्या शोधात गाठलेली एमआयडीसी तर घरी मुलांचा सांभाळ करणाऱ्या आईपुढे निर्माण झालेला उदरनिर्वाहाचा प्रश्न… अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या केडगाव, ताराबाग कॉलनी मधील राठोड कुटुंबाच्या मदतीला शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे धाऊन गेले.
दिव्यांग, मुकबधीर व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करणारे बोडखे यांनी राठोड कुटुंबातील गौरव राठोड (वय 35 वर्ष) व लक्ष्मीकांत राठोड (वय 33 वर्ष) या दोन्ही मनोविकलांग मुलांना जवळ करुन त्यांना नवीन कपडे, फळ व कुटुंबासाठी अन्न-धान्य, किराणा साहित्याची मदत दिली. मुलांचा सांभाळ करणारी त्यांची आई मंगल राठोड यांना साडी व वडिल अशोक राठोड यांना शाल देऊन त्यांचा सन्मान केला. बोडखे यांचा 22 वर्षीय मोठा मुलगा देखील दिव्यांग असल्याने दिव्यांगांप्रती सामाजिक संवेदना जागृक ठेऊन जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून बोडखे यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे , शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा असून, या सेवेतूनच समाधान मिळत आहे. दरवर्षी दिव्यांगांना मदत देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार आहे. दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांच्या जिद्दीला सलाम असून, दिव्यांग मुलामुळे पालकांचे जीवन देखील कठिण होते. मनाने देखील ते खचले जाऊन त्यांच्या मनाला देखील एक प्रकारे अपंगत्व येते. त्यांना देखील सहानुभूती व सन्मान देण्याची गरज असल्याचे सांगितले. तर आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच गरजू घटकांना मदत करण्याची दिलेल्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, या कुटुंबाची फक्त माहिती देताच बोडखे यांनी क्षणाचाही विलंब न करता मदत उपलब्ध करुन दिली. दिव्यांग मुलांच्या घरी जाऊन व त्यांना सहानुभूतीने जवळ करुन केलेली मदत प्रेरणादायी आहे. सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षकाचे बोडखे यांच्या रूपाने दर्शन झाले. सर्व समाजाने या भावनेने दिव्यांगांचा विचार केल्यास दिव्यांगांना शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता आपले चांगले जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.