रस्ते अपघाता संदर्भात उपायोजना करा : दीपक उंडे
अन्यथा पारनेर तालुका युवा सेनेच्या वतीने आंदोलन करू

पारनेर दि.२८ मे (प्रतिनिधी) :
तालुक्यातील सावरगाव, काळेवाडी परिसरामध्ये नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांमध्ये अपघात होऊन चार लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत असून नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय धोकादायक ठरत आहे. नगर-कल्याण रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहे. परंतु अपघातामध्ये जीव जाण्याचे प्रमाणही वाढले असून अलीकडील चार दिवसांमध्ये अपघात होऊन चार बळी गेले त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा धोकादायक ठरत असून शासकीय स्तरावर रस्ते बांधकाम प्रशासनाने महामार्गावर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे असून रस्त्यावर ठीक ठिकाणी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक तसेच रस्त्यालगत गावांच्या ठिकाणी अंडरपास किंवा स्काय वॉक तयार करण्यात यावेत अशी मागणी कर्जुले हर्या येथील पारनेर तालुका युवा सेनेचे तालुका संघटक दीपक उंडे यांनी केली आहे.
यावेळी दीपक उंडे म्हणाले की काळेवाडी सावरगाव परिसरामध्ये नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याकारणाने शासकीय स्तरावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात रस्ते बांधकाम विभागाकडे आम्ही पाठपुरावा करणार असून लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास युवा सेनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन करू असे यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले.