दिव्यांगांच्या कलाकुसर हाताने उजळल्या ज्योती..! दिव्यांगांनी हाताने बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर, २२ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विशेष व कार्यशाळामधील मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिपावली सणानिमित्त हाताने बनवलेल्या वस्तूंचे आज जिल्हा परिषदेत प्रदर्शन संपन्न झाले. प्रदर्शनास अधिकारी कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिव्यांगांच्या कलाकुसर हाताने बनवलेल्या या वस्तूंमुळे घरोघरी ज्योती प्रकाशमान होणार असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात दिव्यागांनी बनविलेल्या पणत्या, मसाला उटणे, शिकेकाई, सुपारी, आकाश कंदिल, देवीची मुर्ती, छोटे आकाश कंदिल व मेणाच्या पणत्या विक्रीस उपलब्ध होत्या. प्रदर्शनास जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भेटी दिल्या. जिल्हा परिषदेस कामानिमित्ताने भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रदर्शनास भेट देत वस्तूंची खरेदी केली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या लोकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्यातील कल्पकता, कलाकुसरीचे कौतुक केले. यामुळे दिव्यांग देखील भारावून गेले होते.