पालकमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबियां समवेत साजरी केली दिवाळी

अहमदनगर दि २४.(प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी कुटुंबीयां समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवाळीचा सण साजरा करीत शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री,राधाकृष्ण विखे पाटील,मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या भागाची पाहाणी करीत आहे.सोमवारी जामखेड श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करून त्यांनी शेतकऱ्यां समवेत दिवाळी साजरी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील कणसेवाडी येथील गणेश बबन इंगळे या शेतकऱ्याचा काही दिवसांपुर्वी सर्प दंशाने मृत्यू झाला.दिवाळीचे औचित्य साधून मंत्री विखे पाटील यांनी कुटुंबियांच्या घरी जावून भेट दिली.या परीवारा समवेत त्यांनी संवाद साधत घटनेची पार्श्वभूमी तसेच उपचारांबाबत माहीती जाणून घेतली.श्रीगोंदा येथील आरोग्य केंद्रा ऐवजी दौंड येथे रूग्ण का दाखल होतात याकडे त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले.
कुटुंबातील मुलांच्या शालेय शिक्षणाबाबत, मंत्री श्री विखे यांनी, आस्थेने चौकशी केली आणि दिवाळीच्या निमित्ताने मिठाईचे बाॅक्स देवून शुभेच्छा दिल्या.शासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना दिल्या.
तालुक्यातील वेळू चिखलवाडी येथे कापूस तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.मंत्री श्री विखे यांनी,या बाधित झालेल्या शेती क्षेत्राची पाहाणी करून पंचनामे व्यवस्थित करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते,जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले,भगवानराव पाचपुते बाळासाहेब गिरमकर दतात्रय पानसरे संदीप नागवडे अनिल ठवाळ, प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसिलदार मिलींद कुलथे यांच्यासह पदाधिकारी, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.